राज्यातील पहिला रुग्ण असण्याची शक्यता

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) जनुकीय चाचणी सुरू झाली असून नुकतेच येथील चाचणीत करोनाच्या ‘एक्सजी’ उपप्रकाराचा नागपुरातील पहिला रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या संवर्गातील रुग्णांच्या नोंदी देशात निवडक असून राज्यातील प्रयोगशाळेतही त्याबाबत माहिती घेतली जात आहे.  हा राज्यातीलच पहिला रुग्ण राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

 मनीषनगर परिसरातील हा ६७ वर्षीय रुग्ण आहे. लक्षणे असल्याने केलेल्या चाचणीत  करोनाचे निदान झाले.  एम्सच्या प्रयोगशाळेत जनुकीय चाचणी झाली.  त्यामध्ये करोनाचा हा नवीन उपप्रकार आढळला. या रुग्णाची विदेशात प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे  डेन्मार्कसह इतर काही देशात आढळलेल्या व भारतात निवडक नोंदवलेल्या ‘एक्सजीची लागण या रुग्णाला कशी झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. हा  उपप्रकार ओमायक्रॉनचे दोन वेगवेगळे उपप्रकार एकत्र येऊन तयार झाल्याचा एम्सचा प्राथमिक अंदाज आहे. एम्सच्या निरीक्षणानुसार, ओमायक्रॉनच्या बीए १ आणि बीए २ या दोन उपप्रकारातून एक्सजी हा नवीन उपप्रकार तयार झाला. या रुग्णाला गेल्या आठवडय़ात सौम्य लक्षणे होती. तो गृह विलगीकरणातच उपचार घेत होता.  हा रुग्ण बराही झाल्याचा अंदाज आहे.  यापूर्वी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) जनुकीय प्रयोगशाळेत करोनाच्या ‘एक्सक्यू’ प्रकाराचे दोन रुग्ण आढळले होते. यापैकी एक नागपुरातील आणि दुसरा जम्मू काश्मीर येथील होता. आता एम्सच्या तपासणीतही नवीन उपप्रकार आढळला आहे. एम्सच्या जनुकीय चाचणी प्रयोगशाळेला कार्यान्वित करण्यासाठी संचालिका मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. मीना मिश्रा (वायपेयी), प्रीती शेरीन, डॉ. लक्ष्मी, सौंदर्यराजन, डॉ. नित्यानंदन, सुब्बय्या सचिन आणि इतरही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती.