नागपूर : भविष्य निवार्ह निधीच्या नियमानुसार एसटीतील प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन खाते आधारकार्ड व बँक क्रमांकाशी संलग्न असायला हवे. त्यानुसार महामंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. परंतु, अद्यापही बऱ्याच जणांचे खाते लिंक नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२१ पर्यंत सगळ्यांचे खाते लिंक करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एसटी) मध्यवर्ती कार्यालय,३१ विभागीय कार्यालये, ३ मध्यवर्ती कार्यशाळा ,२५० आगारे, ३ प्राशिक्षण केंद्र, ९ टायर पुन:स्तरीकरण केंद्र, ५६८ बसस्थानके, ३,६३९ प्रवाशी निवारे उपलब्ध आहेत. येथे सुमारे १ लाख अधिकारी- कर्मचारी नियुक्त आहेत.
या सगळ्यांचे निवृत्ती वेतन खाते आधार व बँक क्रमांकाशी लिंक असावे लागते. त्यासाठी भविष्य निर्वाह संघटनेच्या आयुक्तांनी महामंडळाला कळवले होते. त्यानुसार एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी २८ जुलै २०२१ रोजी सूचना केली. परंतु अद्यापही बऱ्याच जणांचे खाते लिंक नसल्याचे पुढे आले. त्यामुळे महामंडळाने सर्व कार्यालयांना पत्र पाठवत १ सप्टेंबपर्यंत १०० टक्के खाते लिंक करण्याचे आदेश दिले आहे. तसे न केल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार असल्याचेही पत्रात सांगण्यात आले आहे. त्यातच आधार लिंक नसलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून तातडीने विभाग नियंत्रकांनी संबंधित विभाग/ घटक प्रमुखांना स्वतंत्र बैठक घेत ही प्रक्रिया करण्यास सांगितले आहे.
‘‘महामंडळाच्या सूचनेनुसार नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील सगळ्याच कर्मचाऱ्यांचे खाते आधार क्रमांक व बँक खात्यांची लिंक झाले आहेत. नव्याने नियुक्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांची प्रक्रिया सुरू असून त्यांचेही खाते लवकरच लिंक होईल.’’
– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक , नागपूर विभाग