काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला असून ते जनतेच्या न्यायालयात सर्वात मोठे अपराधी म्हणून उभे आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केली.
कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आज नागपुरात निदर्शने केली. या वेळी बोलताना वासनिक यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, मोदी यांनी परदेशातील भारतीयांचा काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, शेतमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के रक्कम देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले, परंतु मोदी यांनी जनतेच्या विश्वासाचा गळा आवळला आहे. जनतेने त्यांना काय शिक्षा द्यायची ठरवावे. भारत आणि पाकचे संबंध वेगळ्या प्रकारचे आहेत. मोदी मात्र त्यांना इच्छा झाली म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रम दौरा नसताना पोहोचतात. त्यानंतर काही दिवसात भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या हवाईतळावर हल्ला केला जातो. हा भारतावरील हल्ला आहे, असेही ते म्हणाले.