नागपूर जिल्ह्य़ात आर्थिक मंदीच्या काळातही सुमारे ५०० दुचाकी व १०० चारचाकी वाहनांची विक्री नागपूर शहर, पूर्व नागपूर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तिन्ही कार्यालयांत नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. यंदा दिवाळीत महागडय़ा वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घट नोंदवली गेली.
नागपूरच नव्हे तर जागतिकस्तरावर सगळ्याच उद्योगांमध्ये आर्थिक मंदी असल्याचे चित्र आहे. नागपूरलाही मंदीची झळ पोहोचत असली तरी नवरात्रीसह दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसत होते. दसऱ्याप्रमाणे दिवाळीतही मोठय़ा प्रमाणांवर वाहनांना मागणी राहण्याची अपेक्षा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने व्यक्त केल्या जात होती. परंतु नागपूरच्या शहर, पूर्व नागपूर व ग्रामीण आरटीओच्या कार्यालयात वाहनांची मागणी मोठय़ा प्रमाणात घटल्याचे पुढे आले आहे.
नागपूर शहर आरटीओत दिवाळीच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांत ४५ चारचाकी वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. तर १६५ च्या जवळपास दुचाकी वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. तर ग्रामीण व पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातही इतर वाहनांच्या विक्री नोंदवण्यात आल्या. दरम्यान, वाहनांना मागणी जास्त नसल्याचे बघत तिन्ही आरटीओ कार्यालयातील अनेक अधिकारी सुट्टीवर वा लवकर घरी गेल्याचेही चित्र अनेक कार्यालयांत बघायला मिळाले. दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी सर्वाधिक वाहनांची विक्री नोंदवल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु या दिवशी केवळ ९ वाहनांची विक्री नागपूर शहर आरटीओ कार्यालयात नोंदवल्या गेली. या तीन दिवसांत एकाही महागडय़ा ऑडी वा सुपरबाईकची अद्याप नोंदणी करण्यात आली नाही. तेव्हा आरटीओच्या अधिकाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केल्या जात होते. नागपूरला झालेल्या ५०० हून जास्त दुचाकी व १०० हून जास्त चारचाकी वाहनांच्या विक्रीमुळे शासनाला सुमारे ९५ लाखांहून जास्तचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीतील दिवाळीत मिळालेल्या उत्पन्नाहून ते कमी आहे.
जुन्या वाहनांनाही मागणी
दिवाळीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्य़ात नवीन दुचाकी व चारचाकी वाहने घेताना काही वाहनधारकांनी जुनी वाहने संबंधित वाहने विक्रेत्यांना विकली.
गेल्या दोन-तीन दिवसात ३५० हून जास्त दुचाकी व चारचाकी वाहने विकल्या गेल्याची माहिती जुन्या वाहन विक्रेत्यांकडून दिली गेली.