नागपूर : इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारत येत्या काही महिन्यांत साध्य करेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केली होती. भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होऊ लागल्यापासून विविध प्रकारच्या नकारात्मक चर्चांनाही वेग आला आहे. असे म्हटले जात आहे की, इथेनॉलचा वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतो आणि इंधन कार्यक्षमता किंवा मायलेज देखील कमी होते. मात्र, सामान्य लोकांमध्ये गैरसमज पसरवले गेले आहेत, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. आता यात तेल कंपन्या आणि उद्योग समुहांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. इथेनॉल मुळे वाहनावर काय परिणाम होणार, याबाबत त्यांनी स्पष्टच सांगितले.

वाहनावर काय परिणाम?

इंधनात इथेनॉलचे ई२० म्हणजेच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल मिश्रण केल्याने वाहनांच्या कार्यक्षमतेवर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये हे इंधन सुरक्षितपणे वापरता येईल, असे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), तेल कंपन्या व वाहन उत्पादकांनी एका परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले.

दोन-तीन वाहन कंपन्यांनी दोन चाकी आणि चार चाकी वाहनांवर तब्बल १ लाख किलोमीटरपर्यंतची चाचणी केली असून त्यात कोणताही बिघाड झालेला नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. जुन्या वाहनांवरही याचा विपरीत परिणाम होत नाही, अशी खात्री ग्राहकांना दिली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) ने स्पष्ट केले की, वाहनांच्या वॉरंटीमध्ये कोणताही बदल होणार नाही. जुन्या वाहनांवरही काही अडचण आली तर वॉरंटी आणि विमा मान्य केला जाईल. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही.

तांत्रिकदृष्ट्या इथेनॉलचे ऊर्जामान पेट्रोलपेक्षा कमी असल्याने मायलेजमध्ये ५-६ टक्क्यांची किरकोळ घट होऊ शकते, मात्र त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसत नाही. त्यासाठी कंपन्या इतर तांत्रिक उपाय करत आहेत. त्यामुळे कार्यक्षमतेत घट झाल्याचा दावा अतिरंजित असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी नमूद केले.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी सांगितले की, ई-२० सुसंगत बनवण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढविण्यात येणार नाहीत. सर्व कंपन्यांनी आधीच आवश्यक चाचण्या पूर्ण करून वाहनांना प्रमाणित केले आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रश्न उद्भवणार नाही.

कार्बन उत्सर्जन कमी

इथेनॉल मिश्रणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. इथेनॉल आता केवळ ऊसापासूनच नव्हे, तर अतिरिक्त भात, मका, खराब धान्ये व कृषी अवशेषांपासूनही तयार होत आहे. त्यामुळे ते अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक ठरते. सरकारनेही याला चालना देण्यासाठी दुसऱ्या पिढीतील (2G) जैवइंधनांच्या उत्पादनावर भर दिला आहे.

उद्योग तज्ज्ञांनी सांगितले की, भविष्यात ई २० पेक्षा जास्त म्हणजे ई २७ किंवा ई ३० मिश्रणाचा विचार केला जाईल. मात्र तो टप्प्याटप्प्याने, उद्योग-ग्राहक सल्लामसलतीनंतरच लागू केला जाणार आहे. त्यामुळे संक्रमण काळात ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही.

“इथेनॉल मिश्रण केवळ तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त नाही, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही,” असे एआरएआयचे संचालक रेझी माथाई यांनी स्पष्ट केले.