अमरावती: करोना संकटाच्‍या काळात अनेक स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रक विस्‍कळीत झाले होते, यात अनेक परीक्षांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या महाराष्‍ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्‍य) परीक्षेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या शारीरिक चाचणीचा मुह‍ूर्त अखेर दोन वर्षांनी गवसला आहे. या परीक्षेची शारीरिक चाचणी आता २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत आयोजित करण्‍यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात आला, तेव्‍हापासून उत्‍तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. २ ते १० नोव्‍हेंबर दरम्‍यान नवी मुंबईतील पोलीस मैदानावर सुमारे १५०० भावी पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीला सामोरे जाणार आहेत.

हेही वाचा… चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या सूचनेनुसार शारीरिक चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्‍यात येणार होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी पुढे ढकलण्‍यात आली होती. आता २ ते १० नोव्‍हेंरबरचा कालावधी त्‍यासाठी निश्चित करण्‍यात आला आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद करण्‍यात आली आहे. पुरूष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी आदी क्रीडा प्रकारात चाचणी होणार आहे, तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी होणार आहे. कामगिरीच्‍या आधारे उमेदवारांना गुणदान केले जाणार आहे.