राजेश्वर ठाकरे

राज्यात गेल्या हंगामात कपाशीवरील बोंडअळीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळण्यात यश आले. परंतु यंदा कापूस हंगामात प्रारंभीच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने राज्यातील विविध जिल्ह्य़ातील पीक पाहणी अभ्यास केला. त्यात गेल्या आठवडय़ात अकोला, यवतमाळ, नांदेड, धुळे, जळगाव जिल्ह्य़ातील काही शेतांमध्ये गुलाबी बोंडअळीची लक्षणे दिसून आली. विदर्भात बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि कीटकनाशकांची फवारणी यातून काही शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. राज्य सरकारने देखील कृषी खाते आणि संबंधित संस्थांना सूचना दिल्या होत्या. यामुळे गेल्या हंगामात बोंडअळीच्या प्रार्दुभावाचे प्रमाण घटले. आता काही जिल्ह्य़ात कपाशीची लागवड करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी येथील पूर्व हंगामी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. अमरावती जिल्ह्य़ातील तिवसा येथे हंगामी कपाशी अजून रोपावस्थेत असल्याने सध्या गुलाबी बोंडअळीचा धोका नाही, असे केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या काही भागातील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पेरणी केली. त्या कपाशीवर सध्या फुले व बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. परंतु हा प्रारंभिक स्वरूपाचा प्रादुर्भाव असून आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सुचवलेल्या उपायांचा त्वरित अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चालू हंगामात राज्यातील विदर्भ, मराठवाडा व खानदेश या तीनही कापूस पट्टय़ात सुरुवातीला लांबलेल्या मोसमी पावसामुळे कोरडवाहू कपाशीची पेरणी जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान झाली. तेथे सध्या हे  पीक शाकीय वाढीच्या (३० ते ३५ दिवस) अवस्थेत आहे.

या कपाशीला अजून पात्या-फुले लागण्यास किमान १० ते १५ दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे सध्यातरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याचा फारसा धोका नाही, असेही वाघमारे म्हणाले.

पूर्व हंगामी कापसाची लागवड टाळा

महाराष्ट्रात कपाशीची लागवड सुमारे ६० ते ८० मिमी पाऊस पडल्यानंतर (१५ जून ते १५ जुलै) करावी लागते.  परंतु ओलिताखालील कापूस पट्टय़ात बहुतेक शेतकरी कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्यादरम्यान करतात. या पूर्व-हंगामी लागवडीमुळे कापसाला पात्या-फुले जुलै महिन्याच्या दरम्यान लागतात. पतंगही याच कालावधीत बाहेर पडत असतात. गुलाबी बोंडअळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. त्यामुळे  पूर्व हंगामी कापसाची लागवड टाळा, असे आवाहन विजय वाघमारे यांनी केले.

प्रादुर्भाव झालाच तर हे करा..

पतंगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन (हेक्टरी पाच) याप्रमाणे पेक्टीनोल्युर किंवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवडय़ाला सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) शिफारशीनुसार कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.