चंद्रपूर : पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी ऊर्जा मंत्रालयाने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी २०० कोटींचा अवाढव्य खर्च करून ६ किलोमीटरच्या पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा पावणेदोन वर्षापूर्वी बसवली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम बंद असल्याने वीज केंद्राला सहा हजार मेट्रिक टन कोळसा ट्रक वाहतुकीतून वीज केंद्रापर्यंत आणावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या सहा किलोमीटर लांबीच्या आधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टमचे लोकार्पण मोठा गाजावाजा करत केले होते. विशेष म्हणजे २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली. या प्रकल्पाची प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता आहे. ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ ही खाणींपासून ऊर्जा प्रकल्पापर्यंत कोळसा वाहतुकीची आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव प्रयोग होता.

हेही वाचा – खळबळजनक! नागपुरातील १०० रुग्णांच्या हातात हत्तीरोगाचे जंतू

कोळसा चोरी टाळण्यासाठी तसेच कमी वाहतूक खर्चात वीज प्रकल्पांना कोळशाची खात्रीशीर गुणवत्ता आणि प्रमाण सुलभ करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभी केली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. त्याचा परिणाम वीज केंद्राला दररोज या माध्यमातून होणारा सहा हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा आता ट्रक वाहतुकीतून करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला वाहतुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहे. दुसरीकडे संपूर्ण ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ बंद पडलेली असल्याने त्याची यंत्रसामुग्री खराब होत असल्याचा आरोप आता होत आहे.

हेही वाचा – विदर्भात आजपासून पावसाचे पुनरागमन; राज्याची स्थिती काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांना विचारणा केली असता, पाईप कन्व्हेअरमध्ये लाेखंडी वस्तू सापडल्याने सिस्टिम बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यांत ही सिस्टीम पूर्ववत सुरू होईल, असेही कुमरवार यांनी सांगितले.