गोंदिया : सात महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी जंगलातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. आता या अभयारण्यात पुन्हा ३ वाघ सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यासाठी वाघांना इतर ठिकाणांहून येथे आणले जात आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या सुमारे १६ वाघ असल्याची माहिती आहे. त्यापैकी मागील दोन-तीन महिन्यांत ११ वाघांचे दर्शन पर्यटकांना सातत्याने होत आहेत.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यासाठी २० मे २०२३ रोजी गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आले. मात्र, या व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्प्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात या व्याघ्र प्रकल्पात सर्वप्रथम एक वाघ सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – “शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो”, विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

गुराख्यांची भूमिका महत्त्वाची

व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांतील गुराख्यांची भूमिकाही याकरिता महत्त्वाची ठरणार आहे. गुराखी दररोज ६ ते ८ तास जंगलात असतात. यावेळी त्यांना प्रत्यक्ष वन्यजीवांच्या विचरण, हालचालींची माहिती मिळते. वन्यजीवांच्या बाबतीत गुराख्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच या क्षेत्राशी निगडीत गुराख्यांची यादी तयार करण्याचे काम लवकरच विभागाकडून केले जाणार आहे. विभागामार्फत गुराख्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचना व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे लवकरच गोंदियाजवळील पांगडी जलाशय परिसरात या विषयावर बैठक आयोजित करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

‘त्या’ वाघिणींपैकी एक मध्यप्रदेशात

मे २०२३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या दोन वाघिणींपैकी एकीने हा परिसर सोडून मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, वाराशिवनी वनपरिक्षेत्रात स्थलांतर केले. त्यानंतर याच परिसरात वाघिणीचा वावर असल्याचे दिसून येत आहे. या वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी सातत्याने ती काही दिवस प्रकाशझोतात होती.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अजित पवारांचेही नागपुरात कार्यालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण पाच वाघ येणार

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ सोडण्याची योजना आहे. जी टप्प्याटप्प्याने राबविली जात आहे. पूर्व नियोजित ५ वाघिणींपैकी २ वाघीण याआधीच सोडण्यात आल्या आहेत. इतर वाघांनाही सोडण्यासाठी विभागाने प्रक्रिया सुरू केलेली आहे. – पवन जेफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प.