नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी यावेळी विविध गोष्टींचे सुद्धा उद्घाटन केले. माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण केले. मोदींकडून यावेळी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करण्यात आली. याचवेळी त्यांनी सर्वांना गुढीपाडवा, नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. याव्यतिरिक्त त्यांनी वैद्यकीय शिक्षणाबाबतची मोठी घोषणा सुद्धा केली. गरीब घरातील मुलांना सोयीस्कररीत्या शिक्षण घेता यावे, त्यांचेही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता आता वैद्यकीय शिक्षण मराठीमध्ये घेता येणार असल्याचे यावेळी मोदींकडून सांगण्यात आले.

नागपुरातून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात आज गुढीपाडवा, उगादीचा उत्सव सुरू आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरु अंगत देव यांचा अवतरण दिवसही आहे. आपले प्रेरणास्रोत डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीचेही निमित्त आहे. संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षेही पूर्ण होत आहेत. आज या निमित्ताने मला स्मृति मंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळाली.

तसेच, लाल किल्ल्यावरून मी सर्व क्षेत्रातील प्रयत्नांबाबत माहिती दिली होती. पण आज आरोग्य क्षेत्रात जे काम होत आहे, त्याला माधव नेत्रालय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहे. आपल्या जीवनात देशासाठी काम केलेल्या वृद्धांना आरोग्याची समस्या होऊ नये, याकरिता त्यांना चांगले उपचार देणे ही सरकारची नीती आहे. आयुष्मान भारतच्या माध्यमातून लोकांना चांगले उपचार मिळत आहेत. यावेळी देशात जवळपास एक हजार डायलिसीस सेंटर आहेत, जिथे मोफत उपचार मिळत आहेत.

यामुळे नागरिकांचे करोडो रुपये वाचत आहेत, अशी माहिती मोदींनी दिली. तर, आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी, आम्ही पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्यास सुरुवात करत आहोत. जेणेकरून ते भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील, अशी महत्त्वाची माहिती मोदींनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहोत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना मोफत उपचार सुविधा मिळत आहेत. हजारो जनऔषधी केंद्रे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे पुरवत आहेत. देशभरातील शेकडो डायलिसिस सेंटर मोफत डायलिसिस सेवा देऊन हजारो कोटी रुपयांची बचत करत आहेत. गेल्या १० वर्षांत, गावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत, जिथे देशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून टेलिमेडिसिनद्वारे सल्लामसलत, प्रथमोपचार आणि पुढील वैद्यकीय मदत दिली जात आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.