लोकसत्ता टीम

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील नक्षल्यांचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या परिसरात वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे नवे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे या परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या नक्षल्यांसोबत पोलिसांची ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक उडाली. पोलिसांच्या प्रत्युत्तराने नक्षलवादी पसार झाले. यावेळी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांगेतुरी पोलीस मदत केंद्राला भेट दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनीच या परिसरात मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी रेकी करायला सुरुवात केली. गर्देवाडा, वांगेतुरी पोलीस मदत केंद्र त्यांचे लक्ष होते. परंतु त्यांच्या योजनेची कुणकुण लागताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी -६० जवानांना नक्षलविरोधी अभियान राबविण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-चंद्रपूर : ओबीसी आरक्षणासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘त्या’ अधिसूचना रद्द करा

पोलिसांनी कांकेर, नारायणपूर, वांगेतुरी, हिद्दूर (ट्राय जंक्शन) परिसरात झाडाझडती सुरू केली. ७ फेब्रुवारी रोजी रात्री हिद्दूर गावालगत ५०० मीटर अंतरावर पोलीस जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षली घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरात झडती घेतली असता घातक शस्त्रसाठा आढळून आला. पिथस, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हूक, सोलर पॅनेल व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.