वर्धा : आमदार सुमित वानखेडे व आमदार दादाराव केचे यांची सर्वपरिचीत पक्षांतर्गत कुरघोडी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनावरून मागे पडल्याने जिल्हा भाजपने सुस्कारा सोडला.
गटबाजी इतर पक्षांप्रमाणेच आता भाजपला पण नवी नाही. पण जिल्ह्यातील आर्वीची गटबाजी संपता संपेना असेच चित्र आहे. विधानसभेची तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या केचे यांना पक्षाने विधान परिषदेवर घेत आमदार केले. पण तेव्हढ्यावर स्वस्थ बसतील तर ते केचे कसले, असे भाजप नेते म्हणतात. महिनाभरपूर्वी आर्वीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केचे यांनी बंडखोरी न करता उमेदवारी मागे घेतली, ही चूकच झाली, असा त्रागा उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत व्यक्त करीत पश्चाताप दाखविला. मात्र, शनिवारी केचे व त्यांचे अघोषित विरोधक आमदार वानखेडे एका मुद्यावर एकत्र आले.
जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन सोडविताना घेतलेली भूमिका अभिनंदनीय असल्याचा ठराव आला. तो आमदार वानखेडे यांनी मांडला व त्यास आमदार केचे यांनी अनुमोदन दिले. एकाच वेळी या परस्पर वैऱ्यांची अशी पडलेली गाठ उपस्थित पदाधिकाऱ्यांना सुखावून गेली, तर अनेकांना हसू फुटले. माजी खासदार रामदास तडस यांनी आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना प्रथम मंत्रिपद व नंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यास तात्काळ मदत देणे आवश्यक ठरते. जिल्ह्यातील चारही भाजप आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेत मोठी मदत देण्याची मागणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणी प्रमाणे मंडळ कार्यकारिणी बैठक नियमित घेण्याची सूचना केली. सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्य नागरिकपर्यंत गेल्या पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पदवीधर मतदारसंघात जिल्ह्यातून किमान ३० हजार मतदार नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर संघटन सचिव उपेंद्र कोठेकर यांनी एक लाख पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, अविनाश देव, वैशाली येरावार, नीलेश किटे व अन्य प्रामुख्याने उपस्थित होते.