देशहितासाठी राजकीय पक्षांनी निर्णय घ्यावा ; नाना पटोले यांचे मत

शिवसेनेने मुखपत्रातून मांडलेली भूमिका ही सत्ता वाचवण्यासाठी नसून देशासाठी मांडली आहे,

नागपूर : देशात भाजप सरकारने निर्माण केलेली परिस्थिती बघता देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत राहायचे हे पक्षांनी ठरवावे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ते शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  शिवसेनेने मुखपत्रातून मांडलेली भूमिका ही सत्ता वाचवण्यासाठी नसून देशासाठी मांडली आहे, कारण ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले, त्यात देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प मांडलेला होता. भाजप सरकारने देशात आल्यानंतर विध्वंस सुरू केला आहे, देशाची मालमत्ता विकणे सुरू केले आहे. सांविधानिक व्यवस्था तुडवली जात असेल तर अशा वेळी ममता बॅनर्जीनी अशा पद्धतीचे वक्तव्य करून एक प्रकारे देश विकणाऱ्याची साथ देणाऱ्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे शिवसेनेने मुखपत्रातून मांडलेली भूमिका देशहिताची आहे. ती सरकार वाचवण्यासाठी नाही, असे पटोले म्हणाले.

काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलाबाबत ते म्हणाले, हा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. विधानसभा अध्यक्षनिवडीबाबतचा निर्णय अधिवेशन काळात होईल, त्या वेळी नावही स्पष्ट होईल. विधान परिषद निवडणुकीत प्रत्येकाची विचारपद्धती असते. काही लोक घोडेबाजार करीत आहेत. काही उमेदवार काहीही न करता विचाराने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात. आम्ही धनशक्ती नाही तर विचाराने निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकूही. आम्ही आश्वासन देत भाजपचे नगरसेवक फोडणार नाही. मात्र जे येतील त्यांचे स्वागत करू.

एसटी संपाबाबत कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेवानियमांचे पालन व्हावे हा आमचा उद्देश आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी कोणाच्या तरी आवाहनाला  प्रतिसाद देऊन आंदोलन करीत असतील तरी चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा, ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही पटोले म्हणाले.

काँग्रेसशिवाय देशात आघाडी तयार होणे अशक्य – मलिक

नागपूर : कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन एक मोठी आघाडी देशात तयार होणार आहे. त्याचे नेतृत्व कोणी करायचे आहे. हे नंतर सामूहिकपणे ठरवू. कॉंग्रेसशिवाय आघाडी तयार होऊ शकत नाही, असे मत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी व्यक्त केले. ते नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीएच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मवाळ भूमिका घेतली आहे. ममता बॅनर्जी यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. देशात काँग्रेसशिवाय आघाड़ी तयार होऊ शकत नाही. हेच शरद पवार यांनी यापूर्वी सांगितले आहे. भाजप विरोधी गट सगळे एकत्रित आल्यानंतर पुढचे निर्णय होईल.  सर्व विरोधक एकत्र यावेत असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या दिशेने आम्ही काम करू. सगळय़ांचे एकजुटीने आघाडीची मोट बांधू आणि एक पर्याय २०२४ च्या निवडणुकीसाठी उभा करून देऊ. देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे २०२४ मध्ये नक्कीच परिवर्तन होईल. केंद्रात जवळपास जवळपास दीडशे जागा वेगवेगळय़ा लोकांसोबत आहे, असेही मलिक म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Political parties should take decisions in the interest of country congress leader nana patole zws