अकोला : ऐन पावसाळ्यात भंडारज बु. येथील महिलांसह ग्रामस्थांनी पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी घागर मोर्चा काढला. पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपये खर्चातून केवळ कागदोपत्री पाणी पुरवठा दाखवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भंडारज बु. येथे जलजीवन मिशन मधून २०२२ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये कंत्राटदाराने ९८ टक्के काम पूर्ण केल्याचा पाणी पुरवठा विभागाचा अहवाल असून त्यावर ४८.७३ लाख रुपये खर्च झाले. जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्यांनी नेमलेला खासगी पर्यवेक्षक, दिल्ली येथील कंपनी आणि कंत्राटदारांनी जलजीवन मिशन कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. योजना फक्त कागदावर पूर्ण झाली असून गावाला ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
देऊळगाव आस्टूल येथील मुख्य जलवाहितीवर शिर्ला फाटा भंडारज येथे जोडणी करून पाणी पुरवठा सुरू केल्याचे कागदोपत्री सांगण्यात येते. मुळात देऊळगाव आस्टूल येथील जलवाहिनीची अकोला-हैदराबाद महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने तोडफोड केली. संपूर्ण जलवाहिनी काढण्यात आली आहे. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केवळ कागदोपत्री पाणी पुरवठा सुरू असल्याचे दाखवले जात असून लाखो रुपयांच्या खर्चानंतरही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत, असे आंदोलक म्हणाले.
दररोज प्रत्येकी किमान ५५ लिटर पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, गावाला पाणी उपलब्ध झालेले नाही. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशन कामामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात यावी, दोषींवर गुन्हे दाखल करून गावाला नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा आदी मागण्या आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या कक्षात धडक दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन सादर केले.
आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांनी भंडारज बु. येथील पाणी पुरवठ्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, तालुका अध्यक्ष, सम्राट तायडे, सचिन शिराळे, सागर इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.