उपराजधानीत ग्राहकांमध्ये भेदाभेद

शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य ग्राहकांनी वीज देयक थकवताच वीज कंपनीकडून त्वरित पुरवठा खंडित केला जातो. परंतु शहरातील विविध राजकीय पक्षांशी संबंधित काही पदाधिकारी व त्यांच्या नातेवाईकांनी वीज देयकं थकवल्यावरही त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्य़ातील ही स्थिती असून वीज कंपन्यांवर त्याकरिता कुणाचा दबाव आहे? असा सवाल केला जात  आहे.

शेतकऱ्यांवर कोटय़वधींची थकबाकी असल्याने वीज कंपन्या अडचणीत असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते.

महावितरणच्या फ्रेन्चाईजी कंपन्यांनाही ही बाब लागू आहे. परंतु शहरातील सर्व राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात एसएनडीएल आणि महावितरणला रस नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वीज कंपन्या सामान्य वीज ग्राहक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये भेदाभेद करतात काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘लोकसत्ता’च्या हाती आलेल्या माहितीनुसार शहरात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप आणि इतरही काही राजकीय पक्षातील अनेक आजी- माजी नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईकांकडे वीज देयक तीन महिने वा त्याहून जास्त काळापासून थकित आहे. काही आजी- माजी नगरसेवकांच्या घरचे मीटर हे त्यांच्या ऐवजी नातेवाईकांच्या नावावर आहे.

परंतु या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात एसएनडीएल वा महावितरण कंपन्या पुढे येत नाही. त्यातच या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यांच्याकडून वीज कंपन्यांवर पुन्हा थकबाकी न भरता वीज पुरवठा सुरू करण्याकरिता दबाव टाकला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या वीज कंपन्यांकडून सामान्य वीज ग्राहक आणि राजकीय पाश्र्वभूमी असलेले वीज ग्राहक यांच्यात भेद केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

थकबाकीदारांकडून देयके भरल्याचा दावा

महावितरणच्या संकेतस्थळावरील यादी गुरुवारी सदर प्रतिनिधीने तपासली असता त्यावर आजी- माजी नगरसेवक वा त्यांचे नातेवाईकांची नावे होती. त्यात प्रामुख्याने आर.जे. शेळके, चंद्रकांत सावरबांधे, धामनदास छब्बलदास, रंजना इंगोले, सुभाष पुणेकर, दीपक वाडिभस्मे, रमेश लोखंडे, शेषराव गोतमारे, जयवंत तराळे, विजय झलके, भारती बोंडे, रामकृष्णा वंजारी, दादाराव रारोकर, तानाजी वनवे, मो. इब्राहिम तोफिक अहमद या ग्राहकांवर ९० दिवसाहून जास्त काळापासून वेगवेगळ्या रकमेत वीज देयकाची थकबाकी आहे. दरम्यान, वीज कंपन्यांकडून व्हीव्हीआयपी ग्राहकांच्या थकबाकीदारांची नव्याने यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात अनेक दिग्गजांची नावे आहे. दरम्यान, तानाजी वनवे यांनी त्यांनी आम्ही वीज देयक नित्याने भरत असून बहुदा विलंबाने ते भरल्याने यादीत नाव असल्याची शंका व्यक्त केली. इतरही बऱ्याच ग्राहकांनी बिल भरल्याचा दावा केला.

नियमानुसार सर्वांवर कारवाई

एसएनडीएल हद्दीतील काही राजकीय पक्षांच्या निवडक पदाधिकाऱ्यांवर वीज देयकाची थकबाकी आहे. परंतु सामान्य ग्राहक आणि राजकीय पदाधिकारी असा भेदाभेद न करता नियमानुसार सर्वावर कारवाई केली जाते. एसएनडीएल वीज देयकाच्या वसुलीबाबत गंभीर असून ही कारवाई पुढे आणखी तीव्रतेने केली जाईल, असे एसएनडीएलच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.