अमरावती : मेळघाटातील धारणी-बैरागड रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यावरच प्रसूतीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने, वेळीच मिळालेल्या मदतीमुळे माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, मात्र या घटनेने रस्त्याच्या दुर्दशेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कोट्यातरमल येथील २८ वर्षीय गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी तिच्या पतीने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी उकूपाठी गावातील नातेवाईकांकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पहाटे ५ वाजताच्या सुमारास बिंदा यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. पतीने तातडीने त्यांना दुचाकीवरून धारणी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण धारणी शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरच, रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे त्यांना पुढे जाणे शक्य झाले नाही आणि रस्त्यातच त्यांची प्रसूती झाली.त्याचवेळी मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी ही गंभीर स्थिती पाहून तत्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. दयाराम जावरकर यांना माहिती दिली. डॉ. जावरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत कार्यरत असलेल्या डॉ. कविता मेंदूकर या घटनास्थळी पोहोचण्याआधीच प्रसूती झाली होती. त्यांनी लगेच बाळाची नाळ कापली आणि माता व बाळाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून, सध्या माता आणि बाळ दोघेही पूर्णपणे ठणठणीत आहेत. बाळाचे वजन २ किलो ४०० ग्रॅम असून, ते निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला असतानाही, रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे.
नागरिकांच्या मते, हे खड्डे गर्भवती महिला आणि इतर पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेकवेळा करण्यात आली, मात्र आश्वासनापलीकडे यांच्याहातात काहीच पडले नसल्याने आजही आरोग्याच्या मुलभुत सुविधांसाठी याठिकाणीच्या ग्रामस्थांना मरण यातना भोगाव्या लागत आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. पण रस्ते चांगले नाहीत.