लोकसत्ता टीम

नागपूर: वज्रमूठ सभेचे मुख्य समन्वयक माजी मंत्री सुनील केदार असल्याने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक विशेषत: माजी मंत्री डॉ. नितीन राऊत या सभेच्या तयारीपासून अंतर ठेवून असल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन पक्षाच्या एकजूट दाखवण्यासाठी आयोजित सभेआधी काँग्रेसमधील नेते एकमेकांविरुद्ध तोंड करून उभे असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे केदार यांच्यासोबत फारसे जमत नाही. त्यामुळे त्यांनी सभेच्या तयारीच्या एकाही बैठकीला हजेरी लावली नाही. एवढेच नव्हेतर महाविकास आघाडीची सभा तोंडावर असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचे निषेधार्थ कमाल चौकात सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दावा लाखाचा, खुर्च्या ४० हजार

१६ एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून दर्शन कॉलनीच्या मैदानाची क्षमता बघता ४० हजार खुर्च्या मैदानात आणि तेवढ्याच लोकांसाठी मैदानाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी एलसीडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी व्यवस्थेचा आढावा घेतला. मैदानाच्या एका टोकाला ४५ ते ५० नेते बसू शकतील, असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मैदानात ४० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची सभा असल्याने हे मैदान अपुरे पडणार आहे. त्यामुळे आयोजकांनी जवळपास ४० ते ५० हजार लोक लाईव्ह कार्यक्रम नंदनवन परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून, चौकातून बघू शकतील, यासाठी एलसीडी स्क्रीन लावले आहेत. एकूणच वज्रमूठ सभेला किमान ९० हजार ते एक लाख लोक जमतील असा अंदाज बांधून नियोजन करण्यात येत आहे.