अनिल कांबळे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यभरातील कारागृहाच्या अखत्यारित असलेल्या ३३० हेक्टर शेतीमध्ये कैद्यांनी गेल्या तीन वर्षांत ९ कोटी रुपयांचे  उत्पादन घेतले. कैद्यांच्या परिश्रमामुळे राज्य कारागृह प्रशासनाला कोटय़वधीचा नफा झाल्याने आर्थिक बळ मिळाले आहे. 

ज्या कैद्यांच्या हातात कला-गुण आहेत, अशा कैद्यांना मजुरी देऊन काम करून घेतले जाते. त्यासाठी राज्यातील सर्वच कारागृहात शेती, उद्योग, कारखाने आणि प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्यामध्ये प्रशिक्षणानंतर कैद्यांना कामावर ठेवले जाते. राज्यात एकूण ४३ कारागृह आहेत. त्यामध्ये नऊ मध्यवर्ती कारागृह, २५ जिल्हा, पाच खुली कारागृह, एक महिला कारागृह आहे. या सर्व कारागृहांत जवळपास २२ हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात असणारे कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैदी या उद्योगधंद्याबरोबर  शेतीमध्येही काम करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये होणारी शेती कारागृह विभागाचा खर्च भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतीचे उत्तम ज्ञान असलेल्या कैद्यांकडून फळभाज्या, पालेभाज्या, ऊस, भात, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, केळी अशा पिकांचे उत्पादन घेतले जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत कारागृह विभागाने शेतीमधून ४ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. २०२० मध्ये ४ कोटी ३८ लाखांचे उत्पादन घेतले. २०२१ आणि २०२२ मध्ये करोनामुळे अनेक कैदी संचित रजेवर सोडल्यामुळे उत्पादन घटले.

पुण्यात शेतीपूरक व्यवसायही

पुणे कारागृहात सेंद्रिय शेती केली जाते. देशी बियाण्यांची पेरणी केली जाते. भाजीपाल्याच्या शेतात कोणतेही रसायन शिंपडले जात नाही. या शेतीतून मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो, कोबी, बटाटा, दोडका, भेंडी, मुळा पिकवला जातो. याशिवाय शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्धोत्पादन, शेळी, बोकड आणि कुक्कुट पालन केले जाते.

पैठण कारागृह अव्वल

शेती उत्पन्नाच्या बाबतीत पैठण येथील खुल्या कारागृहातील कैदी अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी  विविध प्रयोग करून उत्पादन क्षमता वाढवली आहे. त्यानंतर विसापूर कारागृह द्वितीय तर नाशिक रोड खुल्या कारागृहातील शेतकरी कैद्यांचा क्रमांक लागतो. पैठण कारागृहात भाजीपाला, फळे, ऊस मोठय़ा प्रमाणात पिकवला जात असून जवळच्या साखर कारखान्यात पाठवला जात आहे, हे विशेष.

‘सुधारणा व पुनर्वसन’ असे ब्रीद बाळगणाऱ्या राज्यातील कारागृहे शेतीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत उत्पादन घेत आहेत.  कारागृहात फक्त सेंद्रिय शेती केली जाते.

अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह विभाग.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoners in maharashtra jail generated revenue of rs 9 crore through farming in last three year zws
First published on: 08-04-2022 at 01:53 IST