|| राम भाकरे
कठोर नियमांमुळे नाटकसंख्या रोडावली
नागपूर : एरवी विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवर पाच महिन्यांत अडीच ते तीन हजार नाटके सादर होतात. करोनानंतर यंदा प्रथमच रंगमंच खुला करण्यात आला असला शासनाच्या करोना नियमावलीमुळे नाटकांची नोंदणी केवळ सातशेच्या घरात आहे.
झाडीपट्टी रंगभूमी हे विदर्भाचे भूषण असून या रंगभूमीने अनेक कलावंत मराठी रंगभूमीला दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील कलावंतांसाठी मोठा आर्थिक स्त्रोत असलेल्या या रंगभूमीवर गेल्या दीड ते दोन वर्षापासून करोनामुळे प्रयोग झाले नाहीत. राज्य शासनाने गेल्या महिन्यात रंगमंच खुले केले. तरीही अनेक गावात नाटकांना परवानगी नाकारली जात आहे.
साधारणत: दिवाळीनंतर भाऊबिजेच्या रात्रीपासून झाडीपट्टीच्या नाटकांचा पडदा उघडतो. तत्पूर्वी महिन्या दोन महिन्याआधीपासूनच झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र असलेल्या गडचिरोली जिल्यातील वडसा देसाईगंज येथे नाटकांच्या तारखा निश्चित केल्या जातात. परंतु यंदा वडसामध्ये नाटकांची नोंदणीच कमी झाली आहे. २०१९ मध्ये १६०० च्यावर प्रयोग झाले. परंतु यंदा ही संख्या अर्ध्यावर आली आहे.
अर्थकारण असे…
झाडीपट्टीत एकूण ५५ ते ६० नाटक कंपन्या असून जवळपास पाच हजारच्या जवळपास कलावंतांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. साधारणत: एका नाटकाचा खर्च २५ ते ३० हजार रुपये असतो आणि एका नाटकाचे दीड ते दोन लाख उत्पन्न होत असते. झाडीपट्टी रंगभूमीवरील अर्थकारणाचा विचार केला तर ऑक्टोबर ते मार्च या काळातील उलाढाल ७० कोटींपेक्षा जास्त असून जवळपास ५० हजार पेक्षा जास्त व्यक्तींना हंगामी रोजगार देणारा हा उद्योग आहे. काही काही कंपन्या स्वत:हून आयोजकांना फोन करून नाटकांच्या तारखा ठरवत आहेत. मात्र त्यांना पोलिसांची परवानगी नाही. परिणामी, झाडीपट्टी रंगभूमीवरील कोट्यवधींची उलाढाल थांबणार असून त्याचा फटका तेथील निर्मात्यासह रंगमंचावरील व पडद्यामागील कलावंतांना बसणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर नाटक सादर करण्यास परवानगी मिळाली असली तरी शासनाच्या दिशानिर्देशानुसार नाटक सादर करणे शक्य नाही. करोनाची स्थिती आता आटोक्यात आहे. त्यामुळे शासनाने बंधने न घालता नाटकाला परवानगी द्यावी. – शेखर डोंगरे, झाडीपट्टी नाट्य कलावंत.