नागपूर : मध्य भारत आणि पूर्व घाटातील कॉरिडॉर प्रदेश महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगणा या आठ राज्यांत आहेत. हे असंख्य कॉरिडॉरद्वारे एकमेकांशी जोडले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात विकास प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा वेग वाढला असतानाच या प्रकल्पांमुळे हे कॉरिडॉरदेखील खंडित होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील अदानी समूहाद्वारा संचालित अंबुजा सिमेंटच्या प्रस्तावित कोळसा खाणीमुळे वाघांच्या तीन कॉरिडॉरचा बळी जाण्याची शक्यता आहे. ‘अ पॉलिसी फ्रेमवर्क फॉर कनेक्टिव्हिटी कन्झर्वेशन अँड स्मार्ट ग्रीन लाइनियर इन्फ्रास्ट्रक्चर इन द सेंट्रल इंडियन अँड ईस्टर्न घाट टायगर लँडस्केप’ या अहवालात २३ व्याघ्र अभयारण्य आणि वाघांच्या उपस्थितीसह तसेच सुमारे ४६ इतर संरक्षित क्षेत्रांसह हे वाघांचे लँडस्केप भारतातील सर्वात मोठ्या वाघांच्या लँडस्केपपैकी एक असल्याचे नमूद आहे. वाइल्डलाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेचा हा अहवाल आहे.

अटींसह प्रस्तावाला मान्यता

चंद्रपूर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या व्याघ्र कॉरिडॉरमध्ये ८०.७७ हेक्टर वनजमिनीवरील कोळसा खाणीला परवानगी देण्यात आली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८४वी बैठक २६ जूनला पार पडली. या बैठकीत वन्यजीव व्यवस्थापन योजनेच्या अंमलबजावणीसह अनेक अटींसह या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. दुर्गापूर ओपनकास्ट माइन्सने वेकोलीच्या बाजूने प्रस्तावित केलेला हा प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला जोडणाऱ्या कॉरिडॉरमध्ये आहे.

कॉरिडॉरमधून वाघांचे स्थलांतर

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळील अदानी समूहाच्या भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला वनविभागाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची मंजुरी आधीच मिळाली होती. आता नुकतीच कोळसा मंत्रालयाकडून काम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. पेंच ते बोर, बोर ते मेळघाट असा हा कॉरिडॉर असून या कॉरिडॉरमधूनच वाघांचे अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक स्थलांतर झाले आहे.

अधिवासावर परिणाम

नागपूर जिल्ह्यातील वलनी परिसरात अदानी समूहाद्वारे संचालित अंबुजा सिमेंटच्या कोळसा खाणीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित कोळसा खाणीच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पेंच ते बोर, बोर ते ताडोबा, ताडोबा ते नवेगाव-नागझिरा हे वाघांचे कॉरिडॉर आहेत. २०२१ मध्येच वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाने हे टेलिमॅट्रिक कॉरिडॉर असल्याचे स्पष्ट केले आहे. या खाणीला गावकऱ्यांचा विरोध असला तरीही हा विरोध डावलून खाण झाल्यास वाघांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होणार आहे.