अमरावती : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अंतर्गत पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या प्रलंबित फेलोशिप, घरभाडे भत्ता आणि आकस्मिकता निधी मिळालेला नाही. यामुळे हे संशोधक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत.
मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात संधी मिळावी, यासाठी या संस्थेद्वारे सुरु झालेली छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना ही एक मोलाची शिष्यवृत्ती योजना ठरली असून, या माध्यमातून समाजातील शेकडो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी पीएचडी, एम.फिल. सारख्या अभ्यासक्रमांतून आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
‘सारथी’च्या अमरावती विभागीय कार्यालयाकडे २५ एप्रिल २०२५ रोजी संशोधक विद्यार्थ्यांनी सामूहिक निवेदन देत ३० एप्रिलपर्यंत निधी वितरित न झाल्यास १ मेपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर कार्यालयाकडून निधी मागणीसाठी मुख्य कार्यालयास पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीचा घरभाडे भत्ता व आकस्मिकता निधी, तसेच जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीची फेलोशिप प्रलंबित आहे. याचदरम्यान, जानेवारी २०२५ ते जून २०२५ या सहामाहीसाठी प्रगती अहवाल सादर करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. संशोधनासाठी आवश्यक असलेली साहित्य खरेदी, विद्यापीठ शुल्क, प्रवास खर्च आदी सर्व बाबींसाठी त्यांच्याकडे कोणतेही आर्थिक साधन शिल्लक नाही.
‘सारथी’च्या आधारावर काही जण नोकऱ्या सोडून पीएचडीसाठी आले. काहींनी कर्ज काढून विद्यापीठात प्रवेश घेतला. पण नोंदणीपासून आजवरही नियमित आर्थिक मदत मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांना आता पर्याय उरलेला नाही. महिला संशोधक विद्यार्थ्यांनाही अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. घरापासून दूर राहून स्वाभिमानाने शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींवर आर्थिक संकटामुळे पीएचडी अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे.
जर निधी वेळेवर मिळू शकत नसेल तर त्याचे दुष्परिणाम कोण उचलणार? या परिस्थितीमुळे जर कोणी संशोधक आत्महत्येस प्रवृत्त झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची?, असा सवाल संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे. या गंभीर स्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व तात्काळ निधी वितरित करून शैक्षणिक आणि मानसिक त्रासातून सुटका करावी. येत्या आठवड्यातही सादर रक्कम प्राप्त झाली नाही, तर पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संशोधक विद्यार्थ्यांनी दिला आहे.