नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

बहेलिया शिकाऱ्यांचे वादळ पुन्हा महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांवर घोंघावत आहे. नवेगाव अभयारण्यालगतच्या प्रादेशिक परिसरात बहेलिया पद्धतीचा वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा ‘आयरन ट्रॅप’ दोन दिवसांपूर्वी आढळला. गेल्या काही महिन्यांपासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सहाय्यक वनसंरक्षकांपासून वनसंरक्षकापर्यंतची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोसनघाटजवळ एका शेतात दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा सापळा आढळला. त्याच वेळी त्यांनी शेतमालकाला त्वरित ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक चौकशीनंतर शेतकऱ्याला सोडण्यात आले. विशेष म्हणजे हा शेतमालक निसर्ग विकास समितीचा सदस्यही आहे. सापळा सापडण्यापूर्वी धानांवर विष टाकताना तो दिसला आणि त्यातूनच सापळ्याचे हे प्रकरण उघडकीस आले. नवेगाव-नागझिऱ्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला असला तरीही वनखात्याने हा व्याघ्रप्रकल्प पूर्णपणे वाऱ्यावर सोडला आहे. येथे काम करणारे वनमजूर दर दोन महिन्याने बदलले जातात. दोन महिने काम केल्यानंतर चार महिने हे मजूर बेरोजगार असतात आणि पुन्हा सहा महिन्यानंतर त्यांना वनमजुरीसाठी घेतले जाते.

नवेगाव आणि नागझिरा ही दोन अभयारण्ये मिळून व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. नवेगाव अभयारण्यात सध्या टी-६ (कानी) ही वाघीण, तसेच टी-७ आणि टी-८ या वाघांचे वास्तव्य आहे. नागझिरा अभयारण्यातील वाघांच्या अस्तित्वाविषयी अजूनही शंका व्यक्त केली जात आहे. अशा वेळी येथे बहेलिया पद्धतीचा वाघाच्या शिकारीचा सापळा सापडल्यामुळे या व्याघ्र प्रकल्पात शिल्लक असलेल्या वाघांच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

सापळा सापडला, पण त्याचा आकार लहान असल्याने तो वाघाच्या शिकारीसाठी वापरला जाणारा सापळा नाही. शेतमालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे, आणखी चौकशी करण्यात येईल, असे या संदर्भात उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची पदे रिक्तच

राज्याच्या वनखात्याचे लक्ष सध्या पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांवरच केंद्रित झाले आहे. नवेगाव-नागझिऱ्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला, पण अजूनही प्रकल्पाची सुरक्षा ज्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे, ती पदेच वनखात्याने भरलेली नाहीत. उपवनसंरक्षक ठवरे यांच्या निवृत्तीनंतर हे पद अजूनपर्यंत रिक्त आहे. काही दिवस त्यांची जबाबदारी रामगावकर यांनी सांभाळली आणि आता प्रवीणकुमार ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. विभागीय वनाधिकारी अशोक खुणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पदसुद्धा अजूनपर्यंत भरण्यात आलेले नाही. दोन सहाय्यक वनसंरक्षक दर्जाची पदे येथे रिक्त आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातून मुक्त झालेल्या रवीकिरण गोवेकर या वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्याला अजून कोणत्याही खात्यात नेमणूक देण्यात आलेली नाही.