परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या ‘महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग’ या विषयाची प्रश्नपत्रिकाच तयार न केल्याने परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनीला आल्या पावली परतावे लागले. परीक्षा विभागाच्या या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हिवाळी परीक्षांचा पहिला टप्पा सुरू आहे. या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण आणि बहि:शाल विद्यार्थ्यांचीच परीक्षा होते. बुधवारी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर महिला अध्ययन केंद्राच्या चौथ्या सत्राची ‘महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग’ या विषयाची परीक्षा होती. त्यामुळे परीक्षा द्यायला विद्यार्थिनी केंद्रावर पोहचली. तिला उत्तरपत्रिकाही देण्यात आली. मात्र, काही वेळातच या विषयाची प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्राने विद्यापीठाच्या परीक्षा भवन येथे संपर्क केला असता या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली नसल्याचे समोर आले. या विषयाला फार विद्यार्थी नसल्याने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे विद्यापीठाच्या ध्यानीमनीच नसल्याचा खुलाचा विद्यापीठाकडून देण्यात आला. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक यांनी हा विषय विद्यापीठात शिकवलाच जात नसल्याने प्रश्नपत्रिका तयार केली नसल्याचा हास्यास्पद खुलासा केला. विद्यापीठामध्ये जर हा विषय शिकवलाच जात नसेल तर मग संबंधीत विद्यार्थिनीचा परीक्षा अर्ज कसा स्वीकारला?, तिला परीक्षा पत्र कसे पाठविण्यात आले? असा सवाल उपस्थित होत आहे.
विद्यापीठ प्रशासनाची ही चुकीचा फटका या विद्यार्थिनीला सहन करावा लागला. तिचे वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीने आधी कुलगुरू डॉ. काणे यांचे कार्यालयही गाठले. मात्र, कुलगुरू उपस्थित नसल्याने ती शेवटी परीक्षा भवनात पोहोचली. येथील कर्मचाऱ्यानी तक्रार लिहून घेतली. या प्रकरणात माजी विधीसभा सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. कुलरूंच्या तुघलकी आणि एकाधीकारशाहीचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून प्रशासनावरू न कुलगुरूंचे नियंत्रण सुटल्याचा आरोप निंबार्ते यांनी केला.
विद्यापीठामध्ये हा विषय शिकवलाच जात नाही. त्यामुळे या विषयाची प्रश्नपत्रिका काढली गेली नाही. मात्र, संबंधीत विद्यार्थिनीचा परीक्षा अर्ज कसा स्वीकारला याची माहिती घेतो. – डॉ. प्रफुल साबळे संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग .