महाराष्ट्रातील १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांपैकी केवळ नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘रेडिओथेरपी’चा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) काढलेल्या त्रुटी दूर होत नसल्याने या अभ्यासक्रमाची मान्यता २०११ ला काढण्यात आली होती. परंतु त्यानंतरही शासनाने अद्याप त्रुटी दूर केल्या नसल्याने हा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर आहे. हा अभ्यासक्रम बंद झाल्यास विदर्भासह मध्य भारतातील कर्करुग्णांची गळचेपी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात सर्वाधिक कर्करुग्ण मध्य भारतात आढळून येत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. नागपूर गुटखा, तंबाखूसह विविध पदार्थावर घातलेल्या प्रतिबंधानंतरही व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक तोंडाच्या कर्करुग्णांची संख्या नागपुरात वाढत आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये प्रा. डॉ. क्रिष्णा कांबळे यांच्या प्रयत्नाने काही वर्षांपूर्वी ‘रेडियोथेरपी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन जागा मिळाल्या होत्या. अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता एमसीआयने केलेल्या निरीक्षणात येथे लिनियर एक्सलेटर हे उपकरण नसणे, रुग्णांकरिता अपुऱ्या सुविधा, उपकरणांची कमतरता यासह बऱ्याच त्रुटी पथकाला आढळून आल्या होत्या. परंतु मेडिकल प्रशासनासह राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने या त्रुटी दूर करण्याची लेखी हमी ‘एमसीआय’ला दिल्याने या जागा मंजूर केल्या. हा अभ्यासक्रम असलेली मेडिकल ही राज्यातील पहिली संस्था ठरली होती. हे राज्याला भूषणावह असल्यावरही शासनाने या अभ्यासक्रमाला कायम ठेवण्याकरिता एमसीआयने काढलेल्या त्रुटी दूर करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्रुटी दूर होत नसल्याचे बघत २०११ सालच्या सुमारास या अभ्यासक्रमाची मान्यताच ‘एमसीआय’ने रद्द केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या पदव्या या मंजुरी नसलेल्या संस्थेतील असतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ असल्याचे बोलले जात आहे. त्यातच शासनाकडून त्रुटी दूर होऊन हा अभ्यासक्रम पुन्हा एमसीआयकडून मंजूर न झाल्यास तो केव्हाही बंद होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसे झाल्यास ही संस्था प्रत्येक वर्षी रुग्णांच्या उपचाराकरिता मिळणाऱ्या दोन तज्ज्ञ डॉक्टरांना मुकणार आहे. तेव्हा येथे उपचार घेणाऱ्या मध्य भारतातील रुग्णांची गळचेपी होणार आहे. ही मान्यता रद्द झाल्यापासून संस्थेत ८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार शासनाला दिला कुणी? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहे.

त्रुटी दूर झाल्यास रुग्णांना लाभ

‘एमसीआय’ने काढलेल्या त्रुटीत मेडिकलमध्ये रेडियो सर्जरी, ब्रेको थेरपी, ट्रिटमेंट प्लॅनिंग सिस्टीमसह विविध प्रकारच्या सुमारे २० कोटींहून जास्तीच्या उपकरणांची गरज असल्याचे सांगण्यात आले. ही उपकरणे आल्यास कर्करुग्णांवर जागतिक दर्जाचा उपचार शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा लाभ शक्य आहे. मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विभागात प्राध्यापकांचा अनुशेष

मेडिकलमध्ये ‘रेडिओथेरपी’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रा. डॉ. क्रिष्णा कांबळे यांना सेवेवर असल्याचे दाखवून मिळाला आहे. ते सेवानिवृत्त झाल्यावरही सेवा देत असल्याने हा अभ्यासक्रम सुरू आहे. डॉ. कांबळे यांनी सेवा देणे थांबवल्यास हा अभ्यासक्रमच बंद होण्याचा धोका आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radiotherapy courses on the way to closed
First published on: 29-12-2015 at 02:48 IST