अकोला : अकोट येथे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत अवैध सावकाराकडे छापा टाकण्यात आला. अवैध सावकारी प्रकरणात धनादेश, मुद्रांकासह आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
आतापर्यंत अवैध सावकारी प्रकरणात जिल्ह्यात २१४ प्रकरणांमध्ये ६१ गुन्हे दाखल झाले आहे. अकोट शहरात विनापरवानगी अवैध सावकारी केल्या जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाली होती. या प्रकरणात अकोट तालुक्यातील खतोरेवाडी येथील अवैध सावकार गजानन लक्ष्मणराव माकोडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये छापा टाकून शोध मोहीम राबविण्यात आली.
सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे, सहाय्यक निबंधक रोहिणी विटणकर यांनी गठीत केलेल्या पथकाद्वारे छापा टाकण्यात आला. पथक प्रमुख दीपक सिरसाट, डी.डी. गोपनारायण, डी. बी. बुंदेले, जी. एम. कवळे आदींनी छापा कारवाईमध्ये गजानन माकोडे याच्याकडून धनादेश ५९, कोरे मुद्रांक तीन, चिठ्ठी पाच, नोंदवही सात आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. छापा कारवाई सहकार विभागांतर्गत पोलीस बंदोबस्त व पंचा समक्ष करण्यात आली. आतापर्यंत सहकार संस्था कार्यालयामार्फत अवैध सावकारी अंतर्गत बळकावलेल्या एकूण १५१.६४ एकर शेतजमीन व ४७७६ चौ. फुट जागा, एक राहता फ्लॅट तसेच १६३.५० चौ. मी. जागा संबंधितांना परत करण्यात आलेली आहे.
तसेच आजपर्यंत २१४ प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ६१ प्रकरणामध्ये फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून ११५ प्रकरणात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम-१६ व १८(१) अन्वये चौकशी सुरू आहे.
१९४ अधिकृत सावकार
जिल्ह्यात अधिकृत परवानाधारक १९४ सावकार आहेत. यामध्ये अकोला ११०, बार्शीटाकळी ११, पातूर सात, बाळापूर २७, तेल्हार पाच, अकोट १६ व मूर्तिजापूर तालुक्यात १८ सावकारांचा समावेश आहे.
अनधिकृत व्यक्तींकडून व्याजाने पैसा वाटप
अकोला जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह तालुक्याच्या उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कार्यालयात करावी. ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.