अमरावती : रेल्‍वे कर्मचाऱ्याच्‍या सतर्कतेमुळे धामणगाव रेल्‍वे स्‍थानकानजीक मोठा अनर्थ टळला. रेल्‍वे रुळाला मोठा तडा गेल्‍याचे लक्षात येताच ट्रॅकमॅनने चार किलोमीटर धावत जाऊन गांधीधाम-पुरी एक्‍स्प्रेस रोखल्‍याने अपघात टळला. भोलाराम मीना असे या ट्रॅकमॅनचे नाव असून त्‍याचे कौतुक केले जात आहे.

धामणगाव रेल्‍वे नजीक भोलाराम मीना हे गुरुवारी सकाळी रेल्‍वे रुळाची तपासणी करीत होते. यावेळी त्‍यांना एका ठिकाणी रेल्‍वे रुळाला सांध्‍याच्‍या ठिकाणी मोठा तडा गेल्‍याचे दिसले. या मार्गावरून काही वेळातच गांधीधाम-पुरी एक्‍स्‍प्रेस जाणार होती. भोलाराम यांनी सुमारे चार किलोमीटर धावत जाऊन ही एक्‍सप्रेस वेळेत थांबवली. या कामगिरीबाबत भोलाराम यांच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत कोपरमधील बेकायदा बांधकामावर कारवाई

याबाबत रेल्‍वे प्रशासनाला माहिती मिळताच रेल्‍वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले. रेल्‍वे रुळाच्‍या दुरुस्‍तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्‍यात आले. गांधीधाम-पुरी एक्‍स्‍प्रेस सुरक्षितपणे या मार्गावरून नेण्‍यात आली. रेल्‍वे ट्रॅकमॅनच्‍या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. रेल्‍वे वाहतुकीवर त्‍याचा परिणाम झाला नाही. रेल्‍वे रुळाची देखभाल ही अत्‍यंत महत्‍वाची मानली जाते. रेल्‍वे मार्गावर देखरेख ठेवण्‍याचे काम ट्रॅकमॅन हे कुठल्‍याही ऋतूत, प्रतिकूल हवामानात देखील करीत असतात. त्‍यांच्‍या दक्षतेमुळे अनेक अपघात टळले आहेत.

रेल्‍वे पुरस्‍कारांचेही महत्‍व

कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या रेल्‍वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्‍यात येतो. मध्‍य रेल्‍वेच्‍या २० रेल्‍वे कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्‍यात आला होता. त्‍यात भुसावळ विभागातील मिलिंद भालेराव, अमोल अशोक, अजय निकम, के.एन. सिंग, अशोककुमार मिश्रा, मो. खुर्शिद आलम आणि अभिमन्‍यू मौर्य यांचा समावेश होता.

भुसावळ विभागातील कर्मचारी मिलिंद भालेराव यांना रेल्‍वे रुळाला तडा गेल्‍याचे निदर्शनास येताच त्‍यांनी लगेच लोको पायलटला सुचित केले होते. रेल्‍वे मार्गाची देखभाल करणारे अमोल अशोक यांना मुसळधार पाऊस सुरू असताना गर्डर पुलाजवळ धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पाणी असल्याचे आढळले. त्यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना कळवले आणि सेक्शनवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.

हेही वाचा – डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय निकम यांना मुर्तिजापूर-माना दरम्‍यान रेल्‍वे रुळांवर पाणी साचलेले आढळले होते. रुळाखालील माती वाहून गेल्‍याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब मार्गावरून धावणारी रेल्‍वेगाडी लाल झेंडी दाखवून थांबवली. संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याने विभागातील अप आणि डाऊन बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यांनी तातडीने केलेल्या हालचालींमुळे मोठा अनर्थ टळला होता.