दूरवरच्या चक्रि वादळाचा शहराला फटका

नागपूर : तौक्ते चक्रि वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्या उपराजधानीसह विदर्भातील काही जिल्हयांवरदेखील झाला असून मंगळवारी विजांचा कडकडाट आणि ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून आभाळी वातावरण आहे. मात्र, तौक्ते चक्रि वादळाचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू झाल्यानंतर नागपूर शहराला देखील मंगळवारी फटका बसला. सकाळी वातावरण निरभ्र होते, पण दुपारनंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना गेल्या तीन दिवसांपासून आभाळी वातावरण आहे. त्यामुळे उकाड्यातही प्रचंड वाढ झाली होती. त्याचा आणि तौक्ते चक्रि वादळाच्या परिणामामुळे दुपारी चार वाजेनंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. भरदिवसा विजांचा प्रचंड कडकडाट झाला.  तब्बल दोन तास कोसळलेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.  शहरातील अनेक भागात सिमेंट रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाल्याने त्याचाही फटका या वादळी पावसातून वाट काढताना वाहनचालकांना बसला. मात्र,  या पावसाने वातावरणातही बराच गारवा पसरला. कमाल आणि किमान तापमानात देखील बरीच घट झाली. दरम्यान २० मे पर्यंत हे वातावरण कायम राहणार असून त्यानंतर आभाही वातावरण आणि पाऊस परतून पुन्हा तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामानखात्याने दिला आहे.