पावसाळी पर्यटन ही खरं तर पुणे-मुंबईकडची संस्कृती! घाटवळणांवरून पावसाळयात ओसंडून वाहणारे धबधबे, हे फक्त पुणे-मुंबईकडेच बघायला मिळतात आणि मग आठवडय़ाची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी कुणी कुटुंबासह, तर कुणी मित्रमंडळीसह बाहेर पडतात. पावसाळी पर्यटनाची ही परंपरा आता नागपूरसह अवघ्या विदर्भातही रुळत आहे, पण पावसाळी पर्यटनाचा आनंद जेवढा, तेवढाच धोकाही अधिक! नागपूरसह विदर्भातील अशाच काही पर्यटनस्थळावर टाकलेली ही नजर!
पावसाच्या सरी अंगावर झेलत हुंदडण्याचा आनंद काही औरच आणि तो ‘एन्जॉय’ करायचा तर, घराबाहेर पडावेच लागणार. उपराजधानीचा विचार केला तर आधी पावले वळतात ती फुटाळा तलावाकडे! आता तो नागपूरकरांसाठी तलाव नाही तर फुटाळा चौपाटी झाली आहे. सौमित्रांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे, ‘त्याला पाऊस आवडतो, तिला आवडत नाही.’ मात्र, फुटाळाच्या चौपाटीवर आल्यानंतर सौमित्रांच्या या ओळी फिक्या पडतात. येथे आल्यावर पाऊस त्यालाही आवडतो आणि तिलाही तेवढाच आवडतो. गेल्या काही वर्षांत इटालियन, चायनीज संस्कृतीचा विळखा फुटाळ्याला बसलाय, पण पावसाळा आला की धगधगत्या निखाऱ्यावर भाजली जाणारी फुटाळयावरची कणसं बाजी मारून जातात. फुटाळाइतके नाही, पण अंबाझरी तलाव ओसंडून वाहायला लागला की अवघ्या काही क्षणात त्याचं रूप पालटतं आणि पर्यटनस्थळाचं रूप त्याला प्राप्त होतं. नागपूरपासून अवघ्या ३५-४० किलोमीटपर्यंत जात नाही तोच मैत्रबनचा परिसर पर्यटकांना साद घालतो. या परिसरात तलाव आहे एवढंच सर्वाना माहिती, पण येथेही धबधबा कोसळतो हे फार थोडय़ाथोडक्यांना माहिती आहे. ‘मिळून साऱ्या जणी..’ असं म्हणत नागपूरच्या तरुणींनी तीन वषार्ंपूर्वी ४० किलोमीटरचे अंतर सायकलनं तुडवत या धबधब्यावर केलेली धम्माल, अजूनही न विसरता येणारी आहे.
नागपूरपासूनच अवघ्या ५०-६० किलोमीटर अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पात तर पर्यटक प्रवेश करू शकत नाही, पण आसपासची ठिकाणे मात्र पावसाळी पर्यटनाची उत्तम ‘डेस्टिनेशन’ ठरली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रामटेकजवळच खिंडसी जलाशयाच्या मागच्या बाजूला अमोल खंते यांनी ‘अॅडव्हेंचर सिटी’ उभारली आहे. पाऊस अंगावर झेलंत इथले साहसी खेळ अनुभवण्यात एक आगळीच मजा आहे. मग दोन झाडांना बांधलेल्या सेतूवरून पुढे जाणे असो, की त्याच दोन झाडांना बांधलेल्या दोरीवरून लोंबकळत समोर सरकणे! शिवाय अंगावर पाऊस पडत असतानाच बोटिंगची आगळी मजा अनुभवणे! पश्चिम पेंचला लागून असलेले कोलितमारा हे ठिकाणही आता पर्यटकांच्या तेवढेच आवडीचे ठरत आहे. पेंच नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावातल्या निसर्गात पावसाळयातच नव्हे तर उन्हाळयातही पर्यटक तेवढाच रमतो. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा परिसर जेवढा पावसाळी पर्यटनासाळी उपयुक्त तेवढाच उपयुक्त, किंबहूना सर्वाधिक उपयुक्त मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. निसर्गाने कुणाला भरभरून दिले आहे असा प्रश्न कुणी विचारला तर मेळघाट! हे एकच उत्तर येईल. चिखलदरा हे पर्यटनस्थळ आहेच, पण मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दडलेले पावसाळी सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्ग अनुभवण्यासारखं आहे. पुणे-मुंबईतल्या घाटवळणांवर जेवढे धबधबे पाहायला मिळतात, त्याहून कमी पण निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण केलेले धबधबे येथे पाहायला मिळतात. हिरवीगर्द वनराई आणि त्या हिरव्यागर्द वनराईतून फेसाळत बाहेर पडणारे धबधबे! याच पावसाळयात नरनाळा आणि गाविलगड किल्ल्यावर हिरवळीची मखमल पसरते. एरवी ओसाड भासणाऱ्या या किल्ल्यांचे सौदर्य पावसाळयात अगदी खुलून उठते. पावसाळयात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानापासून अवघ्या अध्र्या तासाच्या अंतरावरील इटियाडोह धरणाचा नूरदेखील पालटतो. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात ब्रिटिशांनी बांधलेल्या घोडाझरी तलावाने शतक ओलांडले आहे. पावसाळयात हा तलाव पूर्णपणे भरतो आणि त्याचा आकार घोडय़ासारखा दिसतो. हा तलाव जेव्हा ‘ओव्हरफ्लो’ होतो, तेव्हा सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची तुडुंब गर्दी येथे होते. अशी एक ना अनेक असंख्य ठिकाणे विदर्भात आहेत आणि पावसाळी पर्यटनाची ती ‘डेस्टिनेशन’ ठरत आहेत.
जेवढे आनंददायी, तेवढेच धोकादायक!
पावसाळी पर्यटन जेवढे आनंददायी, तेवढेच ते धोकादायकही! विशेषत: धबधब्यातून पडणारे पाणी अंगावर झेलण्यात मजा असली तरीही अशावेळी मनाचा तोल सांभाळणेही तेवढेच गरजेचे आहे. एकदा का मनावरचा तोल सुटला की त्यातून सावरणे कठीण! धबधब्याखालचे दगड सातत्याने पडणाऱ्या पाण्यामुळे निसरडे झालेले असतात. त्यातच धबधब्याातून पडणाऱ्या पाण्याचा ओघही तेवढाच वेगवान असतो. त्यामुळे जराही मस्ती करणे महागात पडू शकते. आजवर अशी कित्येक उदाहरणे घडलेली आहे, पण तरीही पर्यटकांचा अनावर उत्साह कायम आहे. म्हणूनच आता अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना कामगिरी बजावावी लागत आहे.