अमरावती : शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचल्याने या पुलावरील जड वाहतूक अखेर बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी कठडे लावून वाहतूक वळवली असून आता केवळ दुचाकी आणि कारसारख्या हलक्या वाहनांनाच तेथून प्रवेश दिला जात आहे. राजकमल चौक ते रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम १९६३ मध्ये करण्यात आले होते. या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आले असून पुलाची स्थिती समाधानकारक नसल्याने त्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे विभागाव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागास कळविण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे उड्डाणपुलाच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) काम सुरु करण्यात आले असून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार अस्तित्वात असलेल्या पुलाच्या स्टिल गडर्सला जंग लागलेला आहे. तसेच डेक स्लॅबमध्ये अनेक ठिकाणी भेगा, डेक स्लॅबमध्ये गळती आणि स्टील गर्डर्सना आधार देणाऱ्या अब्टमेंटमध्ये गळती या सारख्या मोठ्या संरचनात्मक अडचणी आढळून आल्या आहेत. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांना पत्र दिले.

या पत्रामध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या कमकुवत घटकावरील ताण कमी करण्यासाठी पूल फक्त हा हलक्या वाहतुकीसाठी खुला करुन वाहतूक मर्यादीत ठेवावी. जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. पर्यायी मार्गाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या पुलावरुन दुचाकी, तीनचाकी, चारचाकी कार वगळता सर्व प्रकारच्या बसेस, सर्व प्रकारच्या मालवाहू वाहन, जड वाहन यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५० कोटींची मागणी

रेल्वे स्टेशन चौकातून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, हमालपुरा अशा विविध मार्गाना हा पुल जोडतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नवीन उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज असल्याची बाब खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लक्षात आणून दिली. बोंडे यांनी या संदर्भातील निवेदन नुकतेच अश्विनी वैष्णव यांना दिले. या ठिकाणी प्रशस्त असा भव्य उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल त्यासाठी रेल्वे विभागाने २५० कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी देखील केली. त्यावर वैष्णव यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत. नवीन पुलाची उभारणी होणार असल्याने हा पूल आता इतिहासजमा होणार आहे, पण तोपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.