scorecardresearch

शेगावात लाखांवर भविकांच्या साक्षीने रामनवमी उत्सव साजरा; राज्यातील नऊशे दिंड्यांसह हजारो वारकरी दाखल

रामनवमी अन् गुरुवार असा योग यंदा जुळून आल्याने संतनगरीत आज लाखांवर भाविकांची मांदियाळी जमली.

ram navmi
रामनवमी उत्सव साजरा

बुलढाणा : नटले-सजलेले  ‘श्रीं’ चे मंदिर, राज्यभरातील लाखांवर भाविक, नऊशे दिंड्यासह आलेले वारकरी, प्रभू रामचंद्रांचा गगनस्पर्शी जयजयकार अन ‘गण गण गणात बोते’ चा निरंतर घोष, अशा थाटात अन् पारंपरिक उत्साहात विदर्भ पंढरी शेगाव येथे आज, गुरुवारी माध्यान्ही प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा >>> नागपूर: ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराचा शंभर वर्षांचा इतिहास; सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

रामनवमी अन् गुरुवार असा योग यंदा जुळून आल्याने संतनगरीत आज लाखांवर भाविकांची मांदियाळी जमली. आज पहाटे काकड आरती व  सकाळी सात वाजता महाआरती पार पडली.  यानंतर भाविकांची संख्या वाढतच गेली. यामुळे मंदिर परिसर ते रेल्वे स्थानक मार्ग भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आले. आज माध्यान्ही रामनवमी उत्सव विधिवत साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी किमान तीन तास तर मुख दर्शनाला वीसेक मिनिटे लागत होती.  जन्मोत्सवानंतर महाप्रसाद वितरणस्थळी दीर्घ रांगा लागल्या. यापूर्वी  भाविकांची गर्दी आणि सुविधा लक्षात घेऊन गजानन महाराज संस्थानाने काल रात्रीही दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. आज सकाळपर्यंत नगरीत नऊशे दिंड्या दाखल झाल्या असून त्यांचीही व्यवस्था संस्थांनतर्फे करण्यात आली. बुधवारपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातील आबालवृद्ध भाविक व भजनी दिंड्या दाखल होण्यास सुरुवात झाली होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या