नागपूर : किन्नर विकास महामंडळाचे सदस्य, किन्नर बहुउद्दीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडाचे सदस्य राणी ढवळे यांनी भाजपकडून महापालिकेची उमेदवारी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती. नागपूर महापालिका निवडणुका जवळ आल्याने शहरातील सर्वच प्रभागांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः प्रभाग २३ मध्ये नव्या आरक्षण रचनेनंतर उमेदवारीबाबतची चाचपणी आणि तयारी अधिकच गतीमान झाली आहे.

या प्रभागातील ‘ड’ ही एकमेव खुली (सर्वसाधारण) जागा असून, याच जागेतून तृतीयपंथी समाजातील राणी धावले यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुमारे १५ ते १७ वर्षे पक्षात कार्यरत असल्याचा दावा करीत त्यांनी औपचारिकरित्या तिकीट मागण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन आरक्षण रचना

नव्या आरक्षणानुसार प्रभाग २३ मधील जागांचे वर्गीकरण असे आहे

२३-अ : अनुसूचित जाती

२३-ब : अनुसूचित जमाती (महिला)

२३-सी : महिला

२३-ड : खुली (सर्वसाधारण)

२०१७ ला २३-(क) ही जागा खुली होती आणि त्या वेळी भाजपचे नरेंद्र बोरकर विजयी झाले होते. आता आरक्षण बदलांनंतर बोरकर यांनी २३-(ड) मधूनच उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. संघटनामध्ये त्यांचा दबदबा असल्याने त्यांचे नावही प्रबळ दावेदारांमध्ये गणले जात आहे.

किन्नर समाजालाही राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे राणी धावले यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही राजकारणात स्थान मिळाले पाहिजे. त्या म्हणाल्या, “पुरुष आणि महिलांप्रमाणे किन्नर समाजालाही न्याय मिळायला हवा. दुसऱ्या राज्यांनी मार्ग दाखवला आहे. नागपूर मागे राहू नये. आम्हालाही नगरसेवक होण्याची संधी मिळाली पाहिजे.”

रायगड नगरपालिका (छत्तीसगड) येथील भारतातील पहिल्या तृतीयपंथी महापौर मधू किन्नर यांच्यापासून प्रेरणा घेतल्याचेही धावले यांनी सांगितले. २८ वर्षीय राणी धावले या हिवरी नगर येथे राहतात आणि त्या दहावीपर्यंत शिक्षित आहेत. सामाजिक कामात सक्रिय असलेल्या राणी यांनी भाजपच्या अंतर्गत कार्यक्रमांमध्ये दीर्घकाळ योगदान दिल्याचा दावा केला आहे.

प्रभाग २३ मध्ये नवा सामाजिक आयाम

भाजपकडून अद्याप उमेदवार मुलाखतींची प्रक्रिया सुरू नसली तरी राणी धावले यांच्या आगमनामुळे प्रभाग २३ (ड) मधील निवडणुकीला नवा सामाजिक आयाम मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. सोमवारी त्या भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याकडे आपला अर्ज सादर करणार आहेत. अंतिम उमेदवाराची घोषणा मात्र पक्षाच्या अंतर्गत निवड प्रक्रियेनंतरच होणार आहे. तृतीयपंथीय समाजातून उमेदवारीची मागणी होत असल्याने नागपूर महापालिका निवडणुकांमध्ये यंदा विविधता आणि सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा अधिक ठळकपणे समोर येण्याची शक्यता आहे.