|| देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागाला कोंडवाडय़ाचे स्वरूप

नागपूर : ग्रामगीतेद्वारे तरुणाईमध्ये मानवता आणि राष्ट्रभावनेचा संदेश रुजावा, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशित विद्यार्थी विभागाकडे भटकतच नाहीत तर ग्रामसेवाव्रती पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या धाक दाखवून कोंडून ठेवले जात आहे. विभागप्रमुखांच्या धोरणाचा निषेध केल्यास विद्यार्थ्यांना गुण देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१५ मध्ये तुकडोजी महाराज अध्यासन सुरू केले. महाराजांच्या विचारांना प्रचार-प्रसार करणे, तरुणाईमध्ये ग्रामोन्नतीचा विचार रुजवणे, महाराजांच्या साहित्यावर अधिकाधिक संशोधन व्हावे हा या अध्यासनाचा उद्देश होता. मात्र, या उद्देशाला हरताळ फासत विभागामध्ये विद्यार्थ्यांना कोंडून ठेवले जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत. अध्यासनामध्ये सुरुवातीला दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाला सध्या प्रथम वर्षांला २५ तर द्वितीय वर्षांला १७ प्रवेश आहेत.

मात्र, यातील एकही विद्यार्थी विभागाडे भटकत नसल्याचे वास्तव आहे.  काही वयोवृद्ध मंडळी वगळता फारसा प्रतिसाद  नाही. राष्ट्रसंतांच्या विचाराची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे तरुणांना याकडे आकर्षित करण्यासाठी विद्यापीठाने ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू केला. प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे विद्यावेतनही देऊ केले. मात्र, विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांसाठी लावलेल्या कठोर नियमांमुळे २० प्रवेशितांमधून दहा विद्यार्थ्यांनी पहिल्याच महिन्यात प्रवेश रद्द केले. अन्य विद्यार्थी नियमित विभागात येत असले तरी विभाप्रमुखांनी लावलेल्या कठोर नियमांच्या जाचाला कंटाळले आहेत. या विद्यार्थ्यांना अध्यासनामध्ये सकाळी ११ वाजता येणे आवश्यक असून ११ ते ११.३० या वेळात सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर सायंकाळी ४ वाजतापर्यंत होणाऱ्या प्रत्येक वर्गात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुठल्याही कलागुणांच्या विकासाला वाव मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडेही याविरोधात तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करण्यात आल्यानंतर अखेर कुलगुरूंच्या आदेशानुसार विभाग प्रमुख प्रा. प्रदीप विटाळकर यांनी सकाळी ८ ते १२ अशी अध्यासनाची वेळ केली आहे. मुळात अध्यासनामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासह प्रात्यक्षिक ज्ञान, विविध चर्चासत्रे, कार्यशाळा याचे आयोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, हल्ली अध्यासनाला कोंडवाडय़ाचे स्वरूप आल्याने विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.

विभाग प्रमुख-विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष

भेदभाव विसरुनी एक हो आम्ही.. अशी शिकवण तुकडोजी महाराजांनी दिली. मात्र, विभागातील काही विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवरून संघर्ष सुरू आहे. विभाग प्रमुख स्वत:कडे अधिकचे वर्ग ठेवून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर अन्याय करत असल्याचा आरोपही काही शिक्षकांनी नाव छावण्याच्या अटीवर केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukadji maharaj nagpur university akp
First published on: 14-02-2020 at 01:50 IST