दोघा भावांच्या उपस्थितीत रवींद्र सावंतचे शवविच्छेदन

मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात १९९४ मध्ये टाडा कायद्यानुसार त्यावर कारवाई करण्यात आली.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुंबईला रवाना
कुख्यात अरुण गवळीचा उजवा हात अशी ओळख असलेल्या रवींद्र सावंतचे शवविच्छेदन त्यांच्या दोन भावांच्या उपस्थितीत रविवारी शासकीय रुग्णालयात झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन होताच रुग्णवाहिकेतून तो मुंबईला रवाना करण्यात आला. त्याच्या पार्थिवावर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईतील जोगेश्वरीच्या रवींद्र सावंतचा सन १९९० ते १९९४ पर्यंत दरारा होता. खंडणी वसुली, अपहरण, हत्यासह अनेक गुन्ह्य़ांत त्याचे नाव होते. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात १९९४ मध्ये टाडा कायद्यानुसार त्यावर कारवाई करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने सन १९९६ मध्ये त्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १९ सप्टेंबर १९९६ ला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून तो नागपुरात शिक्षा भोगत होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्याच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्याला मेडिकलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मध्यवर्ती कारागृहात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा असल्यामुळे पोलिसांनी सावंतच्या नातेवाईकांच्यासमक्षच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सावंतचे दोघे भाऊ नागपूरला आल्यावर दुपारी एक वाजताच्या सुमारास सावंतचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाला. त्याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी तो मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर बाहेर होता. त्यामुळे तो काही दिवस कौटुंबिक वातावरणात राहिला होता. त्याचा मृतदेह स्वीकारण्यासाठी त्याचे भाऊ मनोहर सावंत आणि राकेश सावंत हे आले होते. त्यांनी रवींद्रच्या मृत्यूबाबत कोणतीही हरकत घेतली नाही.

अंत्ययात्रेवर पोलिसांची नजर
रवींद सावंत हा कुख्यात अरुण गवळी याचा उजवा हात होता. त्यामुळे त्याच्या मुंबईत होणाऱ्या अंत्ययात्रेला अनेकांची हजेरी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलीस अंत्ययात्रेवर कडक नजर ठेवणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ravindra sawant post mortem in the presence of two brothers