देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नागपूर : पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देत त्यांचे पुनर्वसन करावे. याबाबत दीर्घकालीन उपाययोजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावल्यास तयार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. २०१९ मध्ये आम्ही जो आदेश काढला होता, त्यात एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊ न मदत केली होती. तो आदेश त्यांनी जसाच्या तसा स्वीकारावा असे आम्ही म्हणत नाही. वाटल्यास त्यात आणखी भर घालावी. मात्र मदतीबद्दल निर्णय घ्यावा. पुनर्वसनाबद्दल मागणी केली आहे. पुरावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून डायव्हर्जन कॅनाल तयार करणे गरजेचे आहे. यंदा तेवढा पाऊसही आला नाही, तसे आकडेही आम्ही सरकारला दिले आहेत, त्यामुळे डायव्हर्जन कॅनॉल, कृष्णा भीमा स्तरीकरण योजना करणे गरजेचे आहे. २५ नोव्हेंबर २०२० मध्ये जागतिक बँकेने त्याला तत्त्वत: मान्यता दिली होती, ती योजना सरकारने पुढे न्यावी, असेही पत्रात म्हटले आहे. पूरग्रस्त भागात मदत व  पुनर्वसनाबाबत चर्चेस आम्ही तयार आहोत.

तीन महिन्यांत इम्पेरिकल डेटा गोळा करणे शक्य

ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकार आता इंपेरिकल डेटा जमा करण्याऐवजी ते वेळ काढत आहे. ते सर्वोच्च न्यायालयात गेले म्हणून ते इंपेरिकल डेटा गोळा करणार नाही, हे योग्य नाही. कदाचित त्यांना आरक्षण द्यायचे नाही. माझा दावा आहे की २ ते ३ महिन्यांत इंपेरिकल डेटा राज्यातच गोळा करता येतो. केंद्र सरकारने यापूर्वी डेटा देता येत नाही हे सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि इम्पेरिकल डाटा आम्ही तयार करणार नाही असे त्यांचे धोरण आहे. केंद्र सरकारला मागणी केली तर ते देत नाही असा आरोप केला जातो; पण हा त्यांचा आपल्या चुका लपवण्याचा आणि वेळकाढू धोरण राबविण्याचा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

‘तोडफोड करणे आमची संस्कृती नाही’

तोडफोड करणे आमची संस्कृती नाही. कोणाच्या अंगावर आम्ही जात नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, असेही देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. भाजप आमदार  प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडू असे विधान केले होते. त्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता लाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready discussion chief minister calls rehabilitation flood victims ssh
First published on: 02-08-2021 at 00:56 IST