नागपूर : किशोरवयात मुला-मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलामुळे मुलामुलींचे परस्परांशी भावनिक नाते निर्माण होते. मात्र मुलांनी प्रेम आणि शारीरिक आकर्षण यामधील फरक ओळखावा. शालेय शिक्षण घेतांना अभ्यासावर भर द्यावा. असे आवाहन नागपूरच्या पोलीस सहआयुकक्त अश्वती दोरजे यांनी केले.
गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथक आणि यंग इंडिया अनचेंज संस्थेच्यावतीने शुक्रवारी मानवी तस्करी रोखण्यासाठी कायदे आणि उपाययोजना या संदर्भात कार्यक्रम झाला.अध्यक्षस्थानी अश्वीत दोरजे होत्या, महिला बाल कल्याण उपायुक्त अपर्णा कोल्हे, चाईल्ड लाईनच्या छाया राऊत, बाल विकास अधिकारी मुश्ताक पठाण, सविता माळी, एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ, भरोसा सेलच्या प्रमुख सीमा सूर्वे, सामाजिक सुरक्षा विभागाच्या शुभांगी वानखडे, श्रद्धा ताळू, देवराज पाटील उपस्थित होते.
सहायक निरीक्षक रेखा संकपाळ म्हणाल्या की, अल्पवयात मुली प्रेमात पडून कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करतात. मात्र त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर अवघड परिस्थिती ओढवते. अनेकदा मुलींवरही पश्चातापाची वेळ येते. त्यांची विक्रीही केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोलिसांना मदत करायला हवी.
सीमा सूर्वे, म्हणाल्या की, प्रेमप्रकरणातून लग्न केल्यानंतर वर्षभरात घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रेम विवाह करताना भविष्याचा विचार करा आणि पालकांनाही विश्वासात घ्या, असा सल्ला दिला.