यवतमाळ : मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने घाटंजीतील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला तब्बल ३५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटंजी येथील भगवान लक्ष्मणराव डोहाळे (६४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदीगड येथील सुशील मिश्रा व्यक्तीविरोधात घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी शहरातील अंबानगरी भागातील रहिवासी भगवान लक्ष्मणराव डोहाळे (वय ६४) यांनी ही आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, भगवान डोहाळे यांनी मुलाच्या एमबीबीएस प्रवेशासाठी ऑनलाइन सर्च करत असताना चंदीगड येथे राहणाऱ्या सुशील मिश्रा हा त्यांच्या संपर्कात आला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने डोहाळे यांच्या मुलाला एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करून देतो, असे आश्वासन दिले होते.
आरोपी मिश्रा याने सुरुवातीला डोहाळे यांचा पूर्ण विश्वास संपादन केला. तो सतत फोन कॉलद्वारे त्यांच्या संपर्कात राहिला. मुलाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने डोहाळे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली, विविध शुल्क आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी केली.डोहाळे यांनीही त्याच्या मागणीनुसार ती रक्कम हस्तांतरित केली. हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार २१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडला.
या काळात डोहाळे यांनी मिश्राला एकूण ३५ लाख रुपये दिले. मात्र, इतकी मोठी रक्कम देऊनही आणि बराच कालावधी लोटूनही, मुलाच्या प्रवेशाबाबत प्रत्यक्षात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. यामुळे डोहाळे यांना संशय आला. त्यांनी स्वतःच्या स्तरावर माहिती घेण्यास सुरुवात केली असता, हा संपूर्ण प्रकारच बोगस असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, भगवान डोहाळे यांनी १४ नोव्हेंबर रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या गंभीर आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी तत्काळ सुरू केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, प्रवीण तालकोकुवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.एमबीबीएस प्रवेशासाठी स्पर्धा बघता अनेक पालक आपल्या मुलांना डॉक्टर करण्यासाठी वाट्टेल तो मार्ग स्वीकारत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. त्यामुळे पालकांनी कुठल्याही ऍडमिशन संदर्भात थेट ऑनलाइन चर्चा, व्यवहार न करता, प्रत्यक्ष शहानिशा करूनच पुढे जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
