वर्धा : छोट्या छोट्या गोष्टीसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असतील, तर त्याचे कारण लपून नसते.असा अनुभव वारंवार घेणाऱ्या सामान्य व्यक्तीची भावना मग लोकप्रतिनिधी व्यक्त करतात.
त्याचे प्रत्यंतर खासदार रामदास तडस यांनाच आले.त्यांनी देवळी तहसील कार्यालयात विविध योजनांची आढावा बैठक घेतली.त्यांनी सुरवातीलाच आपला अनुभव सांगितला. परिश्रम करून निधी आणला जातो.पण तो वेळेत खर्च होत नाही.मग वापस जातो.विकास कामात दिरंगाई केल्या जाते. खोटी माहिती पुरवून दिरंगाई केली जाते.यापुढे अशा अधिकाऱ्यांची गय केल्या जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी भर सभेत भरला.
हेही वाचा >>>व्हाट्सअप टास्क पडले महाग! पोलिसांच्या प्रयत्नाने ऑनलाइन फसवणुकीतील दोन लाख ’होल्ड’
लगेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी तक्रारी सुरू केल्या.तहसील कार्यालयात रेशन कार्ड मिळत नाही.या कार्यालयास दलालांनी घेरले आहे.गावठाण प्रमाणपत्र मिळण्यासाठी काहींचे हात ओले करावे लागतात, असे जाहीर आरोप सभेत झाले.त्यावर खासदारांनी इशारा दिला.घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक करू नका.प्रमाणपत्र त्वरित द्या. विकास कामात अनास्था खपवून घेणार नाही, अशी तंबी खा.तडस यांनी दिली.गावठाण पत्ते त्वरित नियमित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.नियोजन समिती सदस्य राजेश बकाने तसेच दीपक फुलकरी,नरेंद्र मदनकर ,दशरथ भुजडे,सौरभ कडू यांनीही सूचना केल्या.
तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अभियंता व अन्य उपस्थित असलेल्या या सभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला.