बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट व भाजपात चांगलीच जुंपली असताना आणि जागावाटप व उमेदवारीचा गुंता कायम असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. यामुळे माजीमंत्री राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात उतरतात काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील एका महामंडळाच्या सभागृहात बुधवारी ही आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, छगन भुजबळ आदी नेते हजर होते. बुलढाण्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. शाखा, मतदान केंद्र प्रमुख, पक्षाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीला आजवरच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान, पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली.
बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह बुलढाणा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आमदार राजेंद्र शिंगणे ‘इफको’च्या निवडणुकीसाठी दिल्लीला गेले असल्याने ते बैठकीला हजर नव्हते. मात्र त्यांनी नेत्यांना याची पूर्व कल्पना दिल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध

चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या मुहूर्ताची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा कायम आहे. २००९ पासून सलग विजय मिळविणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीची ‘गॅरंटी’ नसल्याचे चित्र आहे. भाजपाने बुलढाण्यावर अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. मित्रपक्षातील या ताणतणावात अजित पवार गटाने बुलढाण्याचा आढावा घेतल्याने महायुतीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा – “भाजपमध्ये कोण जाणार, एकदाचा सोक्षमोक्ष लावा,” काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोनदा झुंज

अजित पवार गटाने घेतलेल्या आढावा बैठकीमुळे मित्रपक्षांसह विरोधकांचे कान टवकारले आहे. भाजपा व शिंदे गटातील तिढा सुटला नाही, तर ऐनवेळी अजित पवार गटाला जागा सुटणार नाही ना? व शिंगणे यांना मैदानात उतरविले जाते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार शिंगणे यांनी यापूर्वी २००९ व २०१९ मध्ये बुलढाण्यात अपयशी झुंज दिली होती.