scorecardresearch

वीज दरवाढीला स्वच्छ कोळशाचा वाढीव खर्चही कारणीभूत

पारस आणि परळीत कच्चा कोळसा वापरून पारस केंद्रात वीज दर प्रतियुनिट  कमी झाले तर परळीत दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली.

वीज दरवाढीला स्वच्छ कोळशाचा वाढीव खर्चही कारणीभूत
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

महानिर्मितीच्या बऱ्याच केंद्रांतील वीजनिर्मिती दरात वाढ

महेश बोकडे

नागपूर : औष्णिक विद्युत केंद्रासाठी वापरण्यात येणाऱ्या धुतलेल्या आणि आयात कोळशाचा खर्च वाढल्याने महानिर्मितीच्या अनेक केंद्रातील वीजनिर्मिती दरात मोठी वाढ झाल्याचे चल दर (व्हेरिएबल कॉस्ट) नोंदीतून स्पष्ट होते. पारस आणि परळीत कच्चा कोळसा वापरून पारस केंद्रात वीज दर प्रतियुनिट  कमी झाले तर परळीत दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली.

राज्यासाठी पुरेशी व किफायतशीर दरात वीजनिर्मिती करणे हे महानिर्मितीचे काम असले तरी प्रत्यक्षात खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर, भुसावळ, नाशिक विद्युत केंद्रात निर्माण होणारी वीज महागडी आहे. येथे निर्मित विजेचे चल दर सप्टेंबर-२२ मध्ये जुलै २२ च्या तुलनेत ४९ टक्क्यांपर्यंत वाढले. चंद्रपूर केंद्राचा दर नेहमी ३ रुपये प्रतियुनिटच्या जवळपास असतो. आता तो ५ रुपये युनिटवर गेला.

दरम्यान, आयात आणि धुतलेला कोळसा वापरणाऱ्या महानिर्मितीच्या केंद्रातच वीजनिर्मितीचे प्रतियुनिट दर अधिक वाढले आहेत. मात्र कच्चा कोळसा वापरलेल्या महानिर्मितीच्याच पारस केंद्रात हेच दर चार टक्क्यांनी कमी झाले. परळी केंद्रात कच्चा कोळसा वापरूनही दरवाढ केवळ ७ ते ८ टक्के दिसून आली. यावरून धुतलेला आणि आयातीत महागडा कोळसा वापरून महानिर्मितीला कोणताही फायदा झाला नाही. वीजनिर्मितीच्या संदर्भात राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार केंद्रे वीजनिर्मिती करू शकली नाहीत. त्यामुळे एकीकडे प्रतियुनिट वीज दर वाढला आणि दुसरीकडे महानिर्मितीला तोटाही सहन करावा लागला. याचा भार ग्राहकांवर पडला.

‘स्टॉक लॉस’ही अधिक

वीज केंद्रात स्वच्छ कोळसा आल्यावर त्याचे नमुने घेतले जातात. त्याचा उष्मांक ४,२०० जीसीव्हीच्या जवळपास दाखवला जातो. कोळसा बंकरमध्ये टाकल्यावर त्याचा उष्मांक ३,३०० ते ३,६०० पर्यंतच कमी दर्शवण्यात आला आहे. प्रत्यक्षात राज्य वीज नियामक आयोगाच्या निकषानुसार उष्मांक १२० जीसीव्हीपेक्षा कमी व्हायला नको. त्यासाठी वीजनिर्मिती केंद्रात कोळशाला खाली-वर करणे, त्यावर पाणी मारणे आदी प्रक्रिया करावी लागते. परंतु ते न केल्यास उष्मांक आणखी खाली घसरतो, असे जय जवान जयकिसान संघटनेचे प्रशांत पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उष्मांकाच्या नोंदी वास्तविकतेपेक्षा अधिक दर्शवल्या जातात, अशाही तक्रारी आहेत.

‘रिजेक्टेड कोल’ वॉशरीजला कमी दरात?

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राने वीजनिर्मिती प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात जळालेला कोळसा निविदा प्रक्रियेद्वारे विकला. कोळशाचा उष्मांक कमी असल्याने महानिर्मितीला प्रतिटन ९३१ रुपये दर मिळाले. दुसरीकडे कोल वॉशरीजला दिलेल्या एकूण कोळशात सुमारे १५ ते २८ टक्के कोळसा नाकारला जातो. दर्जानुसार हे प्रमाण ठरते. नाकारलेल्या कोळशाचा उष्मांक दोन ते अडीच हजार जीसीव्ही आहे. त्यानंतरही हा कोळसा कोल वॉशरीजला केवळ ६०० रुपये टन या दराने दिला जातो. त्यावर जीएसटी आकारली जात नाही. यात गैरप्रकार होत असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केला आहे.

महानिर्मिती काय म्हणते?

महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ईमेलवर दिलेल्या माहितीनुसार, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील ६६० मेगावॅटच्या तीन संचात नोव्हेंबर २०२१ पासून १०० टक्के स्वच्छ कोळसा वापरला जातो. त्याअनुषंगाने वीज उत्पादन क्षमता व इतर मापदंडावर सुधारणा दिसून आली. त्यामुळे स्वच्छ कोळसा वापरूनही विजेचे प्रतियुनिट दर वाढले, असे म्हणता येणार नाही. खनिकर्म महामंडळाने देशपातळीवर कोळसा स्वच्छ करण्याचे दर आणि वॉशरीजने नाकारलेल्या कोळशाच्या किमतीबाबत निविदा काढली होती. त्यानुसार नाकारलेला कोळसा देऊन वॉशरीजकडून निश्चित दर घेतला जातो. या कोळशाची विल्हेवाट त्यातील उष्मांकानुसार कोळसा मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे व कोल कंट्रोलरची परवानगी घेऊन केली जाते. यामुळे महानिर्मितीचे नुकसान होत नाही, असा दावा महानिर्मितीने केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या