Rohit Pawar : भाजपा एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. तसा वापर मनसेचा होऊ नये, राज ठाकरे हे मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी याची काळजी घ्यावी, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“भाजपा एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. राज ठाकरे यांचा तसा वापर होऊ नये. ते मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे भाजपा त्यांचा वापर फक्त मत खाण्यासाठी करून घेईल, ते फक्त होऊ याची काळजी राज ठाकरे यांनी घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो”,अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra News Live : “एका घटकाला काढून टाकायचं का? अशी महायुतीत चर्चा”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
पुढे बोलताना राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात विचारलं असता, “राज ठाकरे कधी भाजपा विरोधात, तर कधी त्यांच्या बाजूने बोलतात, कधी शरद पवार यांच्या बाजूने तर कधी विरोधात बोलतात, त्यांची भूमिका नेहमी बदलत राहते. त्यामुळेच राज्यात त्यांचा एकच आमदार आहे. त्यांच्याकडे नाशिकची महानगरपालिकाही होती. पण पुढे तीसुद्धा त्यांच्या हातातून गेली, यावरूनच त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याचे दिसून येत आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या विधानावरही भाष्य केलं. “कंगना रनौत या कलाकार आहेत. त्यांना राजकारणातलं काही माहिती असेल, असं वाटत नाही. त्या आता खासदार झाल्या आहेत. मुळात ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल आपण बोलू नये. मी कंगना राणावत यांच्या विधानाचा निषेध करतो. तसेच भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतही विचारलं असता, “भाजपा कशाचं आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. वरुन आदेश आला की इथे नाचत बसतात. राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही. अशावेळी भाजपाचे लोक काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहेत. कुठे आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही, हेसुद्धा भाजपाच्य लोकांना कळत नाही”, असे रोहित पवार म्हणाले.