यवतमाळ : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात अनागोंदी सुरू असताना विधिमंडळाची रोहयो समिती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. ३१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ही समिती रोहयोच्या गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा तपासणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात सर्व ‘ऑल वेल’ बसविण्यासाठी कंत्राटदार आणि प्रशासनाची कसरत सुरू आहे. रोहयो समितीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने समितीच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

या समितीने २०२०-२१ ते २०२४-२५ अशा पाच वर्षांतील रोहयो कामांचा गोषवारा अद्यावत माहितीसह तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्य रोजगार हमी अशा दोन्ही योजनांच्या गेल्या पाच वर्षातील कामांची तालुकानिहाय पडताळणी ही समिती करणार आहे. आमदार सुनील शेळके हे या समितीचे अध्यक्ष असून, २५ आमदार सदस्य  आहेत. रोहयो अंतर्गत फलोत्पादन, जलसंधारण, सिंचन विहिरी, जवाहर विहिरी आदी कामांची प्रत्यक्ष तपासणी समितीचे सदस्य करणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (रोहयो), कार्यकारी अभियंता (रोहयो) आणि रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांच्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना रोहयो समितीने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या रोहयोव्या विविध कामांवर किती मजूर क्षमता होती व तेथे पुरुष व महिला मजुरांची किती उपस्थिती राहिली, याचा लेखाजोखाही तालुकानिहाय घेण्यात येणार असल्याने तालुका पातळीवरील यंत्रणांना सध्या घाम फुटला आहे.  जिल्ह्यात पांढरकवडा, उमरखेड, आर्णी आदी तालुक्यातील रोहयो कामांची पडताळणी या समितीने आवर्जून करावी, अशी मागणी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दौऱ्याची जय्यत तयारी

गुरुवार, ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे या समितीचे सदस्य एकत्र येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांसह रोहयो योजनेबाबत अनौपचारिक चर्चा करतील. सकाळी १० वाजता स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांकडून रोहयोबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत जिल्हाधिकारी व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्मातील कामांना  समितीचे सदस्य विविध पथकांद्वारे भेट देऊन पाहणी करतील. या समितीच्या स्वागताची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.