अमरावती : राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या सभेत मांडलेले मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात न आल्याने पालकमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. आमदारांनी मांडलेले मुद्दे जर इतिवृत्तात घेतले जात नसतील, तर आमच्या बोलण्याला अर्थ काय? अशा शब्दात सुलभा खोडके यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
सुलभा खोडके म्हणाल्या, जिल्हा नियोजन समितीमार्फत अमरावती महापालिकेला आधी १२ कोटी निधी मिळत होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे वारंवार मागणी केल्यानंतर मागील तीन वर्षात जिल्हा नियोजनात ३५ कोटी व वर्ष २०२५-२६ च्या नियोजनात अमरावती महापालिकेसाठी ६२ कोटींची नियतव्ये वाढवून तशी तरतूद करण्यात आली आहे.
परंतु, अमरावती शहराची लोकसंख्या जवळपास १० लाखांवर गेली आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता विकासकामांचे नियोजन करतांना निधी अपुरा असल्याने मूलभूत सुविधांकरिता निधीची मोठी अडचण जात आहे. म्हणून जिल्हा नियोजनातून महापालिकेसाठी १०० कोटींचा निधीचा आराखडा मंजूर करण्यात यावा.
विभागीय क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये नवीन लेखाशीर्ष निर्माण करून ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हा क्रीडा संकुल व विभागीय क्रीडा संकुल येथे सेवा सुविधांसाठी शासनाच्या वतीने निधी मिळतो, परंतु देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. या मुद्याकडे सुद्धा खोडके यांनी समितीचे लक्ष वेधले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या किरकोळ दुरुस्ती व देखभालीसाठी सुद्धा निधी वितरित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तरतूद करण्यात यावी, अमरावती मधील शासकीय शैक्षणिक संस्थांच्या इमारती या ५० ते ६० वर्ष जुन्या असल्याने त्या जीर्ण होत आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजनातून भरीव निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी खोडके यांनी यावेळी केली.
बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, धीरज लिंगाडे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.