scorecardresearch

धावत्या ‘आपली बस’ला आग, प्रवासी सुखरूप

महापालिकेच्या शहर बसचे (आपली बस) संचालन करणाऱ्या डिम्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गिट्टीखदान परिसरात पोलीस मुख्यालयाजवळ धावत्या बसला आग लागली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मोठी घटना टळली..

नागपूर : महापालिकेच्या शहर बसचे (आपली बस) संचालन करणाऱ्या डिम्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गिट्टीखदान परिसरात पोलीस मुख्यालयाजवळ धावत्या बसला आग लागली. बसमध्ये ५५ प्रवासी होते, मात्र चालकांच्या प्रसंगवधनाने ते सुखरूप बाहेर पडले व मोठी दुर्घघटना टळली आहे. अग्निशमन विभागाची गाडी तात्काळ पोहचल्यानंतर काही वेळात आग विझवण्यात आली.

ब्राम्हणी फाटा ते महाराजबाग (बस क्रमांक ६१०२) धावणारी आपली बस ब्राम्हणी फाटा येथून निघाली. त्यात ५५ प्रवासी बसले होते. गिट्टीखदान परिसरात पोलीस मुख्यालयाजवळ बस येताच चालकाच्या बाजूला असलेल्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक रूपेश भिवणकरला दिसले. त्यांने लगेच रस्त्याच्या बाजूला बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही प्रवाशांनी भितीने बसच्या मागच्या भागातून खाली उडय़ा मारल्या. सर्व प्रवासी खाली उतरत नाही तोच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची सूचना अग्निशमन विभागाला  देण्यात आल्यावर दोन गाडय़ा घटनास्थळी पोहचल्या आणि काही वेळातच त्यांनी आग विझवली. बसचे दार बंद असते आणि चालकांच्या वेळीच लक्षात आले नसते तर मोठी घटना घडली असती. इंजिनचा काही भाग प्रारंभी जाळत  असताना चालकाने बसमधून उडी घेतली आणि बसचा दरवाजा उघडला त्यामुळे तात्काळ प्रवाशांना उतरणे सोपे झाले.

बस असून सकाळी डेपोतून बस निघाली त्यावेळी त्यातील वायिरग खराब असल्याची माहिती चालकाने डिम्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र तपासणी न करता ती रवाना  करण्यात आली. डेपोमधून निघणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी करण्याची जबाबदारी डिम्स कंपनीकडे आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी बसाची तपासणी करीत नाही. अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग गाडीची वायिरग खराब असल्यामुळे ती शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता आहे मात्र याची चौकशी केल्यानंतर आग कशामुळे लागली हे समोर येईल असे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.

गिट्टीखदान परिसरात पोलीस मुख्यालयाजवळ झालेल्या बस आग दुर्घटनेची चौकशी केली जाईल. आग कशी लागली, बसची तपासणी करण्यात आली होती का, तपासणी केल्यानंतर आणि चालकाने तक्रार केल्यानंतर ती बस का सोडण्यात आली याबाबत माहिती घेतली जाईल.

– रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग महापालिका

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Running bus fire passengers safe negligence ysh

ताज्या बातम्या