पाच हजार ६०० कोटींची उलाढाल ठप्प पडणार

नागपूर : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने  पगारवाढीच्या प्रश्नासह इतरही मागण्या केंद्र सरकारच्या दरबारी नियमितपणे मांडल्या. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. आमची २० टक्के पगारवाढीची मागणी होती. मात्र सरकारला ती मान्य नाही. सरकार केवळ १२.२५ टक्क्यांवर ठाम आहे, जे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे  देशभऱ्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या नऊ संघटनांनी ३१ जानेवारी आणि १फेब्रुवारी २०२० रोजी  संप पुकारला आहे, अशी माहिती संयोजक सुरेश बोभाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संपकाळात विदर्भात ५ हजार ६०० कोटींची उलाढाल ठप्प पडण्याची शक्यता आहे.

बोभाटे म्हणाले, बँक कर्मचाऱ्यांचे पगार दर ५ वर्षांनी वाढतात. हा दीर्घ काळ आहे. यादरम्यान महागाई दुप्पट होते. त्यामुळे आम्हाला २० टक्के पगारवाढ द्यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र सरकार केवळ १२.२५ टक्के वाढ देण्यास तयार आहे. आयबीए ही सरकार आणि देशातील सर्व संघटनांची बाजू मांडणारी एक संघटना आहे. आयबीएने देखील काहीच पावले उचलली नाहीत. पगारवाढीच्या विषयावर सरकार म्हणते बँका तोटय़ात आहेत. बँका जर सरकारच्या आदेशावर दीड हजार कोटींचे मोठय़ा उद्योगपतींचे कर्ज माफ करत असतील   तर बँका तोटय़ात राहणारच. मात्र त्याचा फटका आम्ही का सहन करावा, असा सवालही बोभाटे यांनी यावेळी केला. याशिवाय सेवानिवृत्तीवेतन, नवीन पदभरती, पाच दिवसांचा आठवडा करण्यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच चार अधिकाऱ्यांच्या आणि पाच कर्मचाऱ्यांच्या अशा एकूण ९ संघटनांचे  नागपुरातील सुमारे १५ हजार कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी होत आहेत. यावेळी शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या दीडशेहून जास्त शाखा शंभर टक्के बंद राहतील. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मार्च ११, १२ आणि १३ तारखेलाही आम्ही संप पुकारला आहे. तरीही मागण्या मान्य झाल्या नाही तर १ एप्रिल २०२० पासून आम्ही अनिश्चित काळासाठी संपावर जाणार असल्याचा इशाराही बोभाटे यांनी दिला. या पत्रकार परिषदेला जयंत गुर्वे, व्ही.व्ही. आसाई, स्वयंप्रकाश तिवारी, एल.बी. नंदनवार, प्रदीप केळकर, नागेश दंडे आदी उपस्थित होते.

आज पेट्रोलपंप बंद

गुन्हेगारी वृत्तीच्या काही तरुण-तरुणींनी  बुधवारी  टेलिफोन एक्सचेंज चौकातील जय दुर्गा ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. मात्र पसे देण्यास नकार दिला.  कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले असता  त्यांनी कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने गुरुवारी दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील सर्व पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून कठोर कारवाई होत नाही. याबाबत

पोलीस आयुक्त यांना निवेदनही दिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ  गुरुवारी  दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान शहरातील सर्व पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली.

एटीएम रिकामे होणार

दोन दिवसांच्या संपादरम्यान विदर्भात जवळपास ५ हजार ६०० कोटींची उलाढाल ठप्प पडणार आहे. विदर्भात एका दिवसात २८ हजार ८०० कोटींची उलाढाल होत असते. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने  एटीएम रिकामे पडतील, याकडेही बोभाटे यांनी लक्ष वेधले.