सीबीएसईचे निर्देश धाब्यावर

शाळांमध्ये शालेय साहित्य आणि गणवेश विक्रीस बंदी आणि ठरावीक दुकानदारांकडून खरेदीचा आग्रह न करण्याचे बंधन केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाने (सीबीएसई) घालून दिले असतानाही तुली पब्लिक स्कूल आणि सेंट झेवियर्स शाळेत मात्र पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाची विक्री केली जात आहे. यासंदर्भात शाळांनी एक पत्रक काढून पुस्तके कोणत्या दुकानात, कोणत्या वेळेला, कोणत्या दिवशी, कोणत्या इयत्तेची मिळतील याची माहिती पालकांना दिली आहे.

तुली पब्लिक स्कूलच्या प्राचार्यानी पालकांसाठी काढलेल्या पत्रकात सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील शैल्स इंटरनॅशनल या दुकानातून साहित्य खरेदी करण्याची गळ घालण्यात आली आहे. गणवेश सीताबर्डीच्या ‘रिफ्लेक्शन’ या दुकानातून घेण्यास सांगण्यात आहे आहे. शाळा येत्या २७ जूनला उघडणार असून त्यावेळी सर्व साहित्यानिशी विद्यार्थी सज्ज हवेत, असे पत्रकात म्हटले आहे. हिंगणा एमआयडीसीतील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्राचार्यानीही पालकांसाठी एक परिपत्रक काढले आहे. त्यात पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळण्याच्या तारखा, दिवस आणि वेळ नमूद करण्यात आली असून कोणत्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी कधी यायचे, याचाही तपशील दिला आहे.

यासंदर्भात संबंधित शाळा प्राचार्याशी बोलल्यावर त्यांच्याकडून सारवासारवीची उत्तरे मिळाली. सीबीएसईने परिपत्रक काढल्यानंतर आम्ही पालकांना एनसीईआरटीची पुस्तके घ्यायला सांगितली. पालकांवर कोणतेही बंधने घातली नाही, असे सांगण्यात आले. मात्र, ११ जून २००४ला महाराष्ट्र शासनाने गणवेश व इतर साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती सीबीएसई शाळांनी करू नये, असा शासन निर्णय निर्गमित करूनही शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.

आम्ही दोन महिन्यांपूर्वी पालकांना अशाप्रकारे परिपत्रक दिले होते. मात्र, त्यानंतर सीबीएसईचे परिपत्रक आल्याने आम्ही विक्री थांबवली. आम्ही कोणत्याही प्रकारे पुस्तके, शैक्षणिक साहित्य वा गणवेश शाळेत विकत नाहीत. पालकांना व मुलांना एनसीईआरटीची पुस्तके खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शशिकला धोटेकर, प्राचार्य, सेंट झेवियर्स हायस्कूल, एमआयडीसी

पुस्तके, साहित्य वा इतर वस्तू कुठे मिळतील, याविषयी पालक विचारपूस करतात. केवळ पालकांच्या सोयीसाठी अशाप्रकारे नोटीस आम्ही काढली आहे. कोणत्याही वस्तू शाळेत विकत नसून पालक व विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची पुस्तके आणायला सांगितली आहेत. सर्वच दुकांनामध्ये ही पुस्तके मिळतात. शाळेत सुसूत्रता रहावी म्हणून पालकांनी कुठून पुस्तके वा इतर साहित्य घ्यावे, याची माहिती दिली आहे. कुणावरही सक्ती केली नाही.

अंजू चोप्रा, प्राचार्य, तुली पब्लिक स्कूल, कोराडी मार्ग