बुलढाणा : ब्रिटिश राजवटीपासून अस्तित्वात असलेल्या बुलढाणा जिल्ह्याला इतिहास, संस्कृती, अध्यात्म, पौराणिक असा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य लढ्यातही जिल्ह्याचा वाटा राहिला आहे. राष्ट्रमाता जिजाउंचे माहेर असलेली सिंदखेड राजा नगरी, जागतिक दर्जाचे लोणार सरोवर, शेगाव येथील गजानन महाराज संस्थान, सैलानी बाबा दर्गा, हेमाड पंथी मंदिरे, ज्येष्ठ साहित्यिक अशी जिल्ह्याची विषयानुरूप विविधअंगी ओळख आहे.
राजकारण पुरते सांगायचे झाल्यास आजी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, जुन्या पिढीतील भारत बोन्द्रे, भास्करराव शिंगणे, रामभाऊ लिंगाडे, सुबोध सावजी या नेत्यांचा जिल्हा अशीही बुलढाण्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांत बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचा जिल्हा अशीही जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.पूर्वी कोणत्याच बाबतीत राज्याच्या खिजगणतीत नसलेला हा जिल्हा आमदार संजय गायकवाड यांच्यामुळे चांदा ते बांदा पर्यंत ‘फेमस’ झालाय. राज्यात आघाडीचे सरकार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय गायकवाड हे आमदार होते. मात्र ते शांत होते, जिल्ह्याबाहेर फारसे प्रसिद्ध (!) नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरोधातील बंड (उठाव) नंतर आमदार संजय गायकवाड हे एकदम प्रकाशझोतात आले.
२०१९ मध्ये प्रथमच बुलढाणा विधानसभा मतदार संघातून निवडून आल्यावरही ते प्रारंभी पासून शिंदेच्या बंडात सहभागी झाले. आमदारकीची आपली जेमतेम अडीच वर्षांची राजकीय कारकीर्द पणाला लावून, ते गुजरात, मार्गे आसाम पर्यंत शिंदेच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. यानंतर मात्र ते कायम प्रकाश झोतात, बऱ्या वाईट चर्चेत राहिले, वादग्रस्त ठरले. आमदार संजय गायकवाड हे नाव ऐकताच वाद, वादंग, जहाल टीका, कमरेखालची टीका हे शब्द समोर येतात. आताही ते मुंबईतील (आकाशवाणी )आमदार निवासस्थानातील कँटीन मधील अभूतपूर्व राड्यामुळे मागील तिनेक दिवसापासून चर्चेत आहे. मुद्रित माध्यमाच्या ‘लीड’ बातम्या ठरले. यावर कळस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर आमदार गायकवाड यांनी व्यापून टाकलाय! विधानसभेत त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारख्या प्रतिभावान नेत्याला दोनदा बोलावे लागले. पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना वारंवार माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
हे वादळ एकदोन दिवसात शमण्याची चिन्हे दिसत असतानाच आज बुलढाण्यात कँटीन मधील हाणामारीचे त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन केले. यामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली तर प्रसिद्ध माध्यम अन विरोधकांना मोठे ‘खाद्य’ मिळाले.मुळात संजय गायकवाड असेच आहे आणि मागील ३५ वर्षांपासून ते आक्रमक नेतेच राहिले आहे. ही आक्रमकता कायम राहिली असून ही कमी न होता आणखी वाढली आहे. बंडानंतर त्याला जास्त धार चढली आहे. वादग्रस्तपणा हा त्यांचा स्थायी भाव झाला आहे. अलीकडच्या काळातील त्यांची राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचे केलेले वक्तव्य, पोलिस विभाग सर्वात भ्रस्ट्राचारी ही त्याची मासलेवाईक उदाहरणे ठरावी.
नव्वदीच्या दशकात एकसंघ शिवसेनेतून आपले राजकारण सुरु करणारा हा बहुजन समाजाचा हा नेता कट्टर हिंदुत्ववादी आणि संघटन कुशल असल्याने त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. ते नगरसेवक, त्यांच्या पत्नी पालिका अध्यक्ष अशी मजल मारली तत्कालीन सेना आमदार विजयराज शिंदे यांच्याशी वितुष्ट आल्याने ते सेनेतून बाहेर पडले. छावा या संघटनेच्या माध्यमाने त्यांनी मतदारसंघात कट्टर हिंदुत्व वादी नेता म्हणून ओळख निर्माण केली. सामाजिक कार्यें केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बुलढाणा विधानसभेची दोनदा निवडणूक लढवीत पस्तीस हजार मतापर्यंत मजल मारली. यानंतर राष्ट्रवादीमार्गे ते पुन्हा सेनेत आले.
खासदार प्रतापराव जाधव व विजयराज शिंदे यांच्यात वितुष्ट आल्याने जाधव यांनी प्रतिष्ठेची बाब करून त्यांना २०१९ मध्ये सेनेची उमेदवारी मिळवून दिली आणि ते आमदार झाले. २०२५ च्या निवडणुकीत विरोधकच काय स्वकीय देखील विरोधात एकवटले असताना त्यांनी विजयश्री खेचून आणली. विधिमंडळाची सर्व आयुधे वापरण्यात ते आघाडीवर आहे.अडीच दशकांच्या संघर्षानंतर आमदार झालेले गायकवाड हे फक्त वादग्रस्तच नव्हे विकास, निधी खेचून आणणे यातही तरबेज आहेत. वादग्रस्तपणा आक्रमकता आणि विकासाची तळमळ असा हटके मिलाफ असलेले ते एक अजब रसायन आहे. बुलढाण्याचे सौन्दर्यकरण, अगदी मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय मंजुरी साठी त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकाचा विषय ठरला. पण ते वाद सोडत नाही वाद त्यांचा पिच्छा सोडत हे तेवढेच खरे…