अमरावती : उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍यासोबत जाणाऱ्या नेत्‍यांच्‍या बडतर्फीचे सत्र राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍या गटाकडून कायम आहे. उपमुख्‍यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्‍या आमदारांच्‍या शपथविधीसाठी उपस्थित असलेले राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय खोडके यांना पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वावरून तसेच प्रदेश उपाध्‍यक्षपदावरून बडतर्फ करण्‍यात आले आहे. शपथविधीसाठी संजय खोडके उपस्थित राहिले, त्‍यांचे हे कृत्‍य पक्षशिस्‍त तसेच पक्षाची ध्‍येयधोरणे याच्‍या विरोधी असल्‍याने त्‍यांना तातडीने बडतर्फ करण्‍यात येत असल्‍याचे शरद पवार यांच्‍या गटाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांच्‍या पत्रात म्‍हटले आहे. यापुढे आपण राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्‍ह वापरू नये, अन्‍यथा आपल्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा या पत्रात देण्‍यात आला आहे.

ट्विटरवरून ही माहिती देण्‍यात आली आहे. संजय खोडके यांच्‍यावरील बडतर्फीच्‍या कारवाईची ही दुसरी वेळ आहे. मार्च २०१४ मध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला उघड विरोध केल्‍याबद्दल त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली होती. अमरावती जिल्‍ह्यातील राजकारणात संजय खोडके यांच्‍या गटाचे वर्चस्‍व आहे.

हेही वाचा >>>गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी; विजय ग्रंथाचे पारायण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय खोडके यांच्‍या पत्‍नी सुलभा खोडके या अमरावतीच्‍या कॉंग्रेसच्‍या आमदार आहेत. याआधी बडनेरा विधानसभा मतदार संघातून त्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या होत्‍या. सुलभा खोडके यांना पराभूत करून रवी राणा हे निवडून आले होते. तेव्‍हापासून राणा आणि खोडके यांच्‍यात अनेकवेळा संघर्ष झाला. आता संजय खोडके हे सत्‍तारूढ गटात सामील झाले आहेत. मात्र, सुलभा खोडके यांनी आपण कॉंग्रेस पक्षातच असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.