scorecardresearch

बुलढाणा: कर्मचारी संपावरून आता सरपंचही ‘मैदानात’, जाणून घ्या सविस्तर…

जिल्ह्यातील सरपंच परस्परविरोधी भूमिका घेऊन मैदानात उतरले आहेत.

pension strike
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता टीम

बुलढाणा: जुन्या पेन्शनच्या मागणीवर कर्मचारी पाचव्या दिवशीही ठाम असतानाच आता जिल्ह्यातील सरपंच परस्परविरोधी भूमिका घेऊन मैदानात उतरले आहेत.

चिखली तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायतीने उघड विरोधाची भूमिका घेत मासिक सभेत ‘कणखर’ ठराव मंजूर केला आहे. सरपंच विनोद कणखर यांनी मांडलेल्या या ठरावाचे सूचक सदस्य महादू वाकोडे असून त्याला जया कणखर यांनी अनुमोदन दिले. मंजूर झालेल्या या ठरावाद्वारे कर्मचाऱ्यांना चक्क निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अर्ध्या पगारात काम करायला सुशिक्षित बेरोजगार तयार आहे. कर्मचारी भरतीचे अधिकार ग्रामपंचायतीना देण्याची मागणी देखील या ठरावाद्वारे करण्यात आली असून त्याच्या प्रति मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहे. कर्मचाऱ्यांच्या गलेलठ्ठ वेतनामुळे शासकीय तिजोरीवर मोठा भार पडत असून जनता संपाला वैतागली असल्याचे ठरावात नमूद आहे.

आणखी वाचा- अमरावती : सुटीच्या दिवशीही संपकर्त्यांचा जिल्‍हा परिषदेसमोर डेरा; सोमवारी ‘थाली बजाओ आंदोलन’

दरम्यान, अंढेरा( ता देऊळगाव राजा) ग्रामपंचायतचे सरपंच आर. आर. अंबिलकर यांनी मात्र संपकरी कर्मचाऱ्यांचे समर्थन करून त्यांना जुनी पेंशन लागू करण्याची मागणी केली आहे. ही समस्त गावकऱ्यांची मागणी असून जुनी पेंशन कर्मचाऱ्यांच्या अत्यावश्यक व जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. संपाला पाच दिवस उलटूनही शासन ठोस भूमिका घेत नसल्याची खंत त्यांनी सूचित केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 17:23 IST