२९६ स्कूलबसचे परवाने निलंबित केल्याचा फटका

जिल्ह्य़ातील ‘स्कूलबस’ चालकांना वारंवार संधी देऊनही त्यांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेतल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने २९६ स्कूलबसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. आज सोमवारी शहरातील काही शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी अनेक स्कूलबस वा स्कूलव्हॅन विद्यार्थ्यांना घेण्याकरिता या कारवाईमुळे न पोहोचल्याने त्याचा पालकांनाच फटका बसला. सोमवारी कमी चालकांना हे आदेश प्राप्त झाले असले तरी सगळ्यांना ते मिळाल्यावर हे वाहन रस्त्यावरून बाद झाल्यावर पालकांचा मन:स्ताप वाढला.

नागपूर शहरात १,९१८ ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन्स’मध्ये हजारो शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. या वाहन चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक स्कूलबस व स्कूलव्हॅनमध्ये अग्निशमन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यात काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपत्कालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारचा दांडा, विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही बाबींची व्यवस्था करणे आवश्यक आहे, परंतु त्याकडे बहुतांश चालकांचे दुर्लक्ष आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरात वारंवार स्कूलबस, व्हॅनच्या फिटनेस तपासणीचे आवाहन केल्यावरही अद्याप ४० टक्क्यांहून जास्त बसेसची तपासणीच झाली नाही.

वाहन चालक प्रतिसाद देत नसल्याचे बघत शेवटी शहरातील २९६ स्कूलबसचे परवाने ४ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. ‘लोकसत्ता’ने याप्रसंगी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही सव्वातीनशेवर बसचालकांनाही निलंबनाची अंतिम नोटीस दिल्याचे पुढे आणले होते. दिवाळीची शाळांना सुट्टी असल्याने सुरुवातीला याचा परिणाम जाणवला नसला तरी सोमवारी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बऱ्याच विद्यार्थ्यांना घेण्याकरिता स्कूलबस वा स्कूलव्हॅन गेल्या नाहीत. कमी चालकांना हे आदेश मिळाल्याने सोमवारी कमी वाहन रस्त्यावरून बाद झाले असले तरी सगळ्यांना आदेश मिळाल्यावर शहरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या स्कूलबस, स्कूलव्हॅनची फिटनेस तपासणी गरजेची असून तातडीने ती सगळ्यांनी करावी. वारंवार याकरिता प्रशासनाकडून चालकांना आवाहन केल्यावरही प्रतिसाद न मिळाल्याने काही बसेसचे परवाने निलंबित केले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणत्याही स्थितीत तडजोड करणार नाही.  – रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कारभार), नागपूर शहर

 

untitled-37