बुलढाणा : जिल्हा परिषद म्हणजे राजकारण्याचा अड्डा आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक असो वा माध्यमिक शाळा असो शिक्षणाचा धिंगाणा, अध्यापनाचे तीन तेरा असे अपवाद वगळता चित्र राहते.
जिल्हा आणि शिक्षण विभागाचे देखील मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भादोला येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे देखील विदारक चित्र आहे. गलेलठ्ठ पगार घेऊनही विध्यार्थ्यांना शिकविण्यात तेथील शिक्षकांना रुची नाही की सर्वसामान्य विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी नाही. नुकतेच पालकांनी विध्यार्थ्यांसह केलेल्या शाळा बंद आंदोलन मुळे या शाळेतील मनमानी, मोकाट कारभार चव्हाट्यावर आला, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे भादोला गावाच्या वेशीवर टांगल्या गेली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती कडे केलेल्या तक्रारीनुसार येथे नियुक्त शिक्षक शिकवीन्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शाळेत १९८ विध्यार्थी असून ११ शिक्षक कार्यरत आहेत.अध्यापन तर सोडा विध्यार्थी करतात, कुठे जातात याकडे देखील त्याचे लक्ष नसते. यामुळे काही दिवसापूर्वी अकरा बाल विध्यार्थ्यांना महापुरुषांच्या शपथा देऊन हातावर ब्लेड मारण्यात आले. यामुळे त्यांच्या हातांना जखमा झाल्या. मात्र शिक्षकांना त्याची खबरही नव्हती. शिक्षकांच्या दुर्लक्षमुळे विध्यार्थी कधीही गेट उघडून बाहेर जात राहतात. अश्याच एका बालकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला.
दरम्यान यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मिसाळकर, सदस्यांनी बुलढाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रारी केल्या. मात्र काहीच कारवाई करण्यात आली नाही.
यामुळे शाळा समिती व पालकानी विध्यार्थ्यांसह शाळा बंद आंदोलन केले. यानंतर कुठे प्रशासन हलले. यानंतर शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. एका शिक्षकाची शाळेतून बदली करून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी ही माहिती दिली.